डोंबिवली : आमची मालकी असताना आम्हाला न विचारता व्यापारी गाळा का उघडला, असा प्रश्न करून डोंबिवली पू्र्वेतील पी ॲन्ड टी कॉलनी येथे पाच जणांनी भाजपच्या एक महिला पदाधिकारी आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत आरोपींनी महिलेचा विनयभंग केला. यावेळी झालेल्या झटापटीत महिलेच्या हातामधील सोन्याच्या अंगठ्या गहाळ झाल्या आहेत.
आरोपींच्या मारहाणीत यश सुरेश राणे (२७), त्याची आई भाजपच्या महिला ग्रामीण आघाडीच्या अध्यक्षा सुहासिनी राणे जखमी झाल्या आहेत. दिलीप चांगो म्हात्रे, प्रणव दिलीप म्हात्रे, आशीष दिलीप म्हात्रे, गणेश तिवारी आणि त्यांचा अन्य एक साथीदार या आरोपींनी ही मारहाण केली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात यश राणे यांनी तक्रार केली आहे.
हेही वाचा…डोंबिवली जवळील विकासकाच्या हत्येप्रकरणी चार जणांना जन्मठेप
पोलिसांनी सांगितले, यश राणे याचे डोंबिवलीतील पी ॲन्ड टी कॉलनीत दिलीप म्हात्रे यांच्या इमारतीत तळ मजल्याला व्यापारी गाळ्यामध्ये मोटार दुरुस्तीचे गॅरेज आहे. विजय सोनी, अब्दुल अन्सारी या कामगारांच्या साह्याने यश हे गॅरेज चालवितो. ११ महिन्यांच्या करार पत्राने मागील तीन वर्षापासून यश या गाळ्यात वाहन दुरुस्तीचा व्यवसाय करतो. प्रणव म्हात्रे याच्या बरोबर केलेल्या या कराराची मुदत गेल्या वर्षी संपली होती. तरी या गाळ्याचे भाडे समझोत्याने यश राणे गाळा मालक दिलीप यांना देत होता. यश यांचा गाळा रस्ता रूंदीकरणात बाधित होत असल्याने मालक दिलीप यांचा मुलगा प्रणव म्हात्रे याने यशला गाळा खाली करण्यास सांगितले होते.
त्याप्रमाणे यशने साथीदारांच्या साहाय्याने गाळ्यातून काही सामान काढून घेतले होते. उर्वरित सामान आतमध्ये असल्याने त्याने गाळ्याला कुलूप लावून ठेवले होते. त्याचवेळी मालकाने या गाळ्याला स्वतःचे कुलूप लावले होते. उर्वरित सामान बाहेर काढण्यासाठी शनिवारी रात्री यश राणे साथीदारांसह पी ॲन्ड टी कॉलनीत गेला होता. त्याने मालकाला न विचारता गाळ्याचे कुलूप तोडून शटर उघडून आत प्रवेश केला.
हेही वाचा…कल्याणमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या तरूणाविरूध्द गुन्हा
त्यावेळी मालक प्रणव म्हात्रे याने यशला तू आम्हाला न विचारता गाळा का उघडला, असे प्रश्न करून प्रणवने त्याच्या आरोपी साथीदारांना घटनास्थळी बोलविले. त्यांनी यशला बेदम मारहाण केली. ही माहिती मिळताच यशची आई सुहासिनी राणे याही घटनास्थळी आल्या. त्यांना प्रणव याने अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. त्यांना जोराने जमिनीवर लोटून दिले. या झटापटीत त्यांचा विनयभंग प्रणवने केला, असे तक्रारीत म्हटले आहे. या झटापटीत सुहासिनी यांच्या हातामधील दोन सोन्याच्या अंगठ्या गहाळ झाल्या आहेत. यशला केबल, पट्टे यांनी मारहाण करण्यात आली आहे. यश, सुहासिनी यांना दुखापती झाल्या आहेत. मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.