कल्याण : कल्याणमधील भाजप पदाधिकारी आणि नेत्यांनी गुरुवारी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात दंड थोपटले. नंदू जोशी यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदविणारे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांचे निलंबन होईपर्यंत शिंदे गटाला सहकार्य करायचे नाही आणि त्यांच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकायचा, असा ठराव गुरुवारी मंथन बैठकीत करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून आलेल्या दबावामुळे भाजपचे डोंबिवली पूर्व विभागाचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा पक्षाच्या नेत्यांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक गुरुवारी सकाळी झाली. बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. विनयभंग प्रकरणातील पीडित महिलेचा पोलीस अधिकारी पतीदेखील यावेळी उपस्थित होता. बैठकीमध्ये पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक भाषणे केली. खासदार श्रीकांत शिंदे यांना सहकार्य करायचे नाही, अशी जाहीर भूमिका यावेळी घेण्यात आली. राज्याचे गृहमंत्रीपद भाजपकडे असतानाही एका नेत्याच्या दबावामुळे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत असेल तर सत्ता काय कामाची, असा सवालही उपस्थित करण्यात आला. सत्तेमधील भागीदार म्हणून संयम आणि शांतता किती काळ ठेवायची? त्यापेक्षा अशी सत्ता नकोच, असे भाजपचे प्रदेश चिटणीस गुलाबराव करंजुले म्हणाले.
‘आम्ही सांगू तोच उमेदवार’
कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्ते सांगतील तोच उमेदवार मान्य केला जाईल. अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही, अशी भूमिका भाजपच्या या बैठकीत घेण्यात आली. त्यामुळे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध भाजप हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता असून, यातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कसा मार्ग काढणार, हा प्रश्न आहे.