उल्हासनगरात भाजपला चिंता; मराठी ध्रुवीकरणाचा सेनेचा प्रयत्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंधी मतांचे गणित लक्षात घेऊन कलंकित नेते पप्पू यांचे पुत्र ओमी यांच्यासोबत आघाडी करत शिवसेनेला धक्का देण्याची रणनीती एकीकडे भाजपने आखली असली तरी ‘सिंधी तितुका मेळवावा’ ही रणनीती पक्षाच्या अंगलट येण्याची भीती आता भाजपच्या चिंतन बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. उल्हासनगरातील जवळपास ४० प्रभागांमध्ये सिंधीबहुल मतांचा दबदबा असला तरी येथील मराठी मतांचे गणितही दुर्लक्षण्यासारखे नाही. ओमी-आयलानी आणि एकंदर सिंधी केंद्रित राजकारणामुळे मराठी मतांचे शिवसेनेच्या दिशेने धुव्रीकरण होऊ शकते, अशी भीती भाजपच्या काही नेत्यांनी व्यक्त केली असून त्यामुळे जागावाटपात रिपाइंला योग्य ते स्थान देण्याचा विचार आघाडीच्या नेत्यांनी सुरू केला आहे.

काही वर्षांपूर्वी सिंधी-मराठी मतांची गोळाबेरीज करत कुमार आयलानी यांनी शिवसेनेच्या मदतीच्या जोरावर उल्हासनगरात पप्पू कलानी यांचा पराभव केला होता. त्यानंतर महापालिका निवडणुकीतही शिवसेना-भाजप युतीचा विजय झाला होता. त्यामुळे येथील सिंधी मतांच्या राजकारणाला धक्का पोहोचू लागल्याचे चित्र उभे करत दोन वर्षांपूर्वी ज्योती कलानी यांनी पुन्हा एकदा सिंधी मतांचे गणित जुळवून विजय संपादन केला. त्या वेळी युती तुटल्याचा फटका आयलानी यांना बसला. यंदा युती तुटण्याची चिन्हे दिसू लागल्याने भाजपने पुन्हा एकदा सिंधीबहुल प्रभागांचे गणित जुळविण्यासाठी कलानी यांच्यासोबत जवळीक वाढविण्यास सुरुवात केली. या जवळकीचे रूपांतर आघाडीत झाले असले तरी या आघाडीकडून सिंधी मतांचे तुष्टीकरण सुरू असल्याचा आरोप आता शिवसेना नेत्यांनी दबक्या आवाजात सुरू केला आहे. या प्रचाराचा धसका भाजप नेते घेऊ लागले असून पक्षाच्या चिंतन बैठकीतही याविषयी चर्चा झाल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

उल्हासनगर विकास आघाडी या नावाने स्थापन झालेली आघाडी ही मुळात सिंधीबहुल मतदारसंघात प्रभावी आहे, असा दावा शिवसेना नेत्यांकडून केला जात आहे. शहरातील उर्वरित मतदारसंघात विजय मिळवायचा असेल तर सिंधी मतांचा आग्रह सोडावा लागेल, असे आता आघाडीचे नेते बोलू लागले आहेत. सध्याचे नगरसेवकांचे बलाबल पाहता दहा प्रभागांमध्ये मराठी नगरसेवकांची संख्या जास्त असून आठ प्रभागांमध्ये सिंधी नगरसेवकांचे वर्चस्व आहे. तर दोन प्रभागांत परिस्थिती संमिश्र आहे. त्यामुळे फक्त सिंधीचे राजकारण नुकसानीचे ठरू शकते, असा सूर भाजपच्या बैठकीत उमटल्याचे सांगण्यात येते.

प्रभागनिहाय समीकरणे

* उल्हासनगर शहरातील प्रभाग क्रमांक एक ते चार येथे मराठी आणि इतर भाषिकांचे वर्चस्व आहे. पुढे पाच, सहा, आठ या प्रभागांत सिंधी मतदारांची संख्या अधिक आहे. मात्र बहुजन आणि स्थलांतरितांची मतेही येथे आहेत.

* सातव्या प्रभागात कलानी कुटुंबाचे वर्चस्व आहे. मात्र येथील अनेक समस्या जशास तशा असल्याने कलानी कुटुंबाबद्दल नाराजी आहे.

* प्रभाग नऊ मध्ये साई पक्ष आणि उत्तर भारतीय मतदारांचा प्रभाव आहे.

* प्रभाग   क्रमांक ११ आणि १२ सोडल्यास प्रभाग क्रमांक १०, १३, १४, १५ या प्रभागांतही मराठी मतदारांचा भरणा अधिक असून येथे शिवसेनेने मराठी मतांचे राजकारण आक्रमक पद्धतीने सुरू केले आहे.

* प्रभाग क्रमांक १६ आणि १७ मध्ये सिंधी मतदार अधिक आहेत. त्यामुळे येथे सिंधी नगरसेवकांचीच संख्या अधिक आहे.

* प्रभाग क्रमांक १८, १९ आणि २० मध्ये एक अपवाद वगळता मराठी भाषिकांचाच भरणा अधिक आहे. त्यात अनेक सिंधीबहुल मतदारसंघात मराठी मतांची संख्याही अधिक आहे. उत्तर भारतीय, पंजाबी आणि मुस्लीम समाजाचीही अनेक मते अशा प्रभागांत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp worry for sindhi voters in ulhasnagar
Show comments