ठाणे : ठाण्यात भाजपची जनता दरबाराची संस्कृती साडेतीन दशकांची असून ठाण्यातील नाईकवाडी येथील कार्यालयापासून ते खोपट येथील कार्यालयात हा जनता दरबार भरत होता असा दावा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वनमंत्री गणेश नाईक हे ठाण्यात जनता दरबार आयोजित करणार असल्याने शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शीत युद्ध रंगले आहे. गणेश नाईक यांच्या घोषणेनंतर आता भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनीही ‘आमदार आपल्या भेटीला’ या उपक्रमातून जनता दरबार भरविण्याचे ठरविले आहे. याविषयी केळकर यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता, त्यांनी भाजपच्या ३५ वर्षांच्या जनता दरबार भरवित असल्याचा दावा केला.

गेल्या दहा वर्षांत विधानसभेचा सदस्य म्हणून आणि त्या आधी विधान परिषदेचा सदस्य म्हणून माझ्या कार्यालयात बसून रोज शेकडो लोकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवत आलो. हा जनता दरबारच आहे. गेल्या दहा वर्षात आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम मी राबवत असून मतदारसंघातील प्रत्येक गृहसंकुलांमध्ये जाऊन या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडवत आहे. आतापर्यंत या उपक्रमाने दीडशेचा आकडा पार केला असून त्याला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे, सहभाग वाढत आहे. हा उपक्रम देखील जनता दरबारच असल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले.

सध्या सोमवार आणि शुक्रवार खोपट येथील कार्यालयात मी आणि माझे सहकारी आमदार निरंजन डावखरे बसून लोकांच्या समस्या ऐकून त्या विविध पातळ्यांवर सोडवत असतो. यावेळी ठाणे शहरच नव्हे तर जिल्ह्यातून नागरिक येत असल्याचे केळकर म्हणाले.

भाजपला ‘अच्छे दिन’ आल्यानंतरच जनता दरबार हा उपक्रम सुरू झाला असे नाही. तर संपूर्ण देशात भाजपचे अवघे दोन खासदार असताना सुद्धा ठाणे जिल्ह्यात हा उपक्रम आम्ही नाईकवाडी येथील भाजपच्या कार्यालयात १५ वर्षाहून अधिक काळ राबवला होता असे केळकर यांनी सांगितले. तत्कालीन खासदार रामभाऊ कापसे, आमदार जगन्नाथ पाटील, भाजपचे पदाधिकारी ॲड. चिंतामण वनगा, अरविंद पेंडसे, वीणा भाटिया आणि मी विभागीय अध्यक्ष म्हणून नाईकवाडी येथील कार्यालयात दर मंगळवारी नागरिकांच्या तक्रारी ऐकवून त्या सोडवण्यासाठी बसत होतो. हा देखील जनता दरबारच होता.

त्यावेळी आम्ही वाडा, मोखाडा, जव्हार पर्यंतचे वाड्या-पाडे पिंजून काढत होतो. तेथील समस्या, पाणी टंचाई याबाबत खडानखडा माहिती गोळा करून मंगळवारी कार्यालयात एकत्र बसत होतो. त्यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून नागरिक समस्या घेऊन येत. या तक्रारी घेऊन त्याच दिवशी विविध विभागात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करत आणि समस्या सोडवत होतो. तत्कालीन जिल्हाधिकारी जॉयस शंकरन यांच्याशी वारंवार या माध्यमातून भेटी व्हायच्या. ग्रामीण भागातील समस्यांची आमच्याकडे खडानखडा माहिती आणि नोंदी असल्याने जिल्हाधिकारी अथवा अन्य अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटत असे, किंबहुना या माहितीचा प्रशासनाला देखील फायदाच व्हायचा, असे देखील केळकर म्हणाले.

नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्या संबंधित प्रशासनाकडून सोडवून घेणे, त्यातून नागरिकांना दिलासा देणे हा जनता दरबार उपक्रमाचा हेतू असून गेल्या ३५ वर्षांत मी माझ्या कार्यालयात, पक्षाच्या कार्यालयात आणि आमदार आपल्या दारी या विक्रमी उपक्रमाच्या माध्यमातून गृहनसंकुलांमध्ये जनसेवेचा दरबार भरवत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.