सागर नरेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेला रोखण्यासाठी एकी

आगामी लोकसभेची निवडणुक एकत्र येऊन लढणाऱ्या शिवसेना आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर मात्र कलगीतुरा सुरूच असून ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील शेतकरी मतदारांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेचा पाडाव करण्यासाठी भाजपने थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे.

या आघाडीमुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे कार्यकर्ते कमालीचे संतापले असून विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात रणिशग फुंकण्याची तयारी यापैकी काहींनी सुरू केली आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या १७ मार्च रोजी होत आहे. एकूण १८ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रत्येकी  एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.

उरलेल्या १६ जागांसाठी १२१ गावांमधील १८ हजार ७०० मतदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपचे उमेदवार आमनेसामने लढणार अशी अटकळ अगदी सुरुवातीपासून बांधली जात होती. मात्र, शिवसेनेच्या पाडावासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी मोट बांधल्याने ही निवडणूक चर्चेत आली आहे. ही महाआघाडी करण्यात भाजपच्या मुरबाड-बदलापूरातील एका बडय़ा नेत्याने महत्वाची भूमिका बजावली असून कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला पराभूत करा, असा संदेश घेऊन हा नेता फिरत असल्याने शिवसेनेत कमालीची अस्वस्थता आहे.

एकूण १८ जागांपैकी दोन जागा बिनविरोध झाल्याने उरलेल्या १६ पैकी सात जागांवर  भाजप, चार ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार उभा करण्यात आला आहे. एक जागा मनसेला देण्यात आली आहे.

शिवसेनेला पराभूत करण्यासाठी भाजपचे आमदार किसन कथोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते गोटीराम पवार यांच्यासोबत प्रचार करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे उमेदवार सदा सासे यांनी केला आहे. कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात बहुतांश फलकांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे नेते एकत्र असल्याचेही चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळते आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमात आहेत.

या संदर्भात भाजपचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांची प्रतिक्रिया घेण्याचा वारंवार प्रयत्न केला असता त्यांनी कोणत्याही प्रतिसाद दिला नाही.