जलवाहिन्यांमधून पाणी चोरून छोटय़ा टेम्पोतून शहरांतील नागरिकांना विक्री
पाण्याच्या समस्येने मे महिन्यापूर्वीच उग्र रूप धारण केल्याने एकीकडे पाण्याच्या शोधात नागरिक दाहीदिशा हिंडत असल्याचे चित्र असताना पाण्याच्याच जिवावर अनेक ठिकाणी खिसा भरण्याचा प्रकार सुरू झाला आहे. ‘आमच्या गावात पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प आहे. त्यामधील हे पाणी आहे,’ असे सांगत डोंबिवलीलगत असलेली २७ गावे, ठाणे पालिका हद्दीतील दिवा परिसरातील गावांतील तरुण मंडळी पाणीविक्रीच्या व्यवसायात उतरली आहेत. लहान टेम्पोमध्ये पाण्याच्या टाक्या भरून ५०० ते १००० रुपयांना विक्री करण्यात येत असून हे पाणी जलवाहिन्यांतून चोरले जात असल्याचा संशय आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची पाणी कपात ५५ टक्क्यांच्या घरात पोहोचल्याने डोंबिवलीलगत असलेली २७ गावे, दिवा, मुंब्रा परिसरात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कळव्यापासून दिवापर्यंत आणि पुढे २७ गावांपर्यत सलग ७५ तास पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवासी हैराण झाले आहे. पुढील काही दिवस हे दुर्भिक्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहे. हे लक्षात घेऊन पाण्याचा काळा बाजार सुरू झाला असून औद्योगिक विकास महामंडळ तसेच ठाणे महापालिकेचा पाणीपुरवठा ज्या दिवशी बंद असतो असे दिवस हेरून ही सुटी विक्री सुरू असते असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. एक हजार लिटर पाण्याला ५०० रुपये अशा दराने पाण्याची विक्री करण्यात येत आहे. लहान टेम्पोमध्ये दोन हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. या टाक्यांना शंभर ते दोनशे फुटाचे पाइप जोडण्यात आले आहेत. एक चालक आणि एक पाइप सांभाळणार असे दोन जण टेम्पोत असतात. पाणीटंचाई अधिक जाणवत असलेल्या भागांत हे टेम्पो फिरत असून नागरिकही ते पाणी खरेदी करत असल्याचे दिसत आहे. दिवा, २७ गावांतील जलशुद्धीकरण प्रकल्पातून हे पाणी आणले जात असल्याचा विक्रेत्यांचा दावा आहे. मात्र, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने अशा प्रकारे कोणतेही वितरण होत नसल्याचा दावा केला आहे. एमआयडीसी तसेच ठाणे महापालिकेच्या मुख्य जलवाहिन्या हेच या पाणी विक्रेत्यांचे स्रोत असल्याचे समजते. ठाणे महापालिकेच्या अंतर्गत दिवा, आगासन, बेतवडे या गावांच्या हद्दीत काही ग्रामस्थांनी चोरीच्या नळ जोडण्या घेतल्या आहेत. तेथून या पाण्याच्या टाक्या भरल्या जात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा