अंध शिवम पाटीलचा शैक्षणिक प्रवास सुकर

कधी कधी कठोरपणे केलेल्या कारवाईमुळे काही निष्पाप आणि गरजूंना गैरसोयीला सामोरे जावे लागते. ठाणे वाहतूक शाखेने कठोरपणे केलेल्या कारवाईमुळे अशीच अडचण शिवम पाटील या अंध विद्यार्थ्यांसमोर उभी राहिली. कर्तव्यकठोर सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांना त्याने त्याची समस्या दूरध्वनीवरून सांगितली. त्यानंतर कारवाई थांबली नाही. मात्र त्याच्या शिक्षणातही खंड पडला नाही. वाहतूक शाखेचा एक कर्मचारी दररोज शिवमला नेण्या-आणण्यासाठी लक्ष्मीनारायण यांनी नेमला. गेले दोन महिने शिवमचा प्रवास अशा पद्धतीने नियमितपणे सुरू आहे.

लक्ष्मीनारायण यांच्या संवेदनशीलतेचा हे केवळ एक उदाहरण आहे. दररोज संध्याकाळी भरणाऱ्या दरबारात अशा अनेकांचे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाहेरचे प्रश्न त्यांनी तडीस लावले आहेत. लक्ष्मीनारायण यांच्या बदलीचे वृत्त कळताच शिवमने बुधवारी त्यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात लक्ष्मीनारायण यांनी स्वत:च्या कामाचा वेगळा ठसा ठाण्यात उमटविला. सामान्य नागरिकापासून ते विविध सामाजिक संघटनांशी त्यांचा जवळून संबंध आला. काही वेळेस नागरिकांच्या मदतीसाठी ते थेट पोलीस ठाण्यात जायचे. यामुळे गेल्या दोन वर्षांत लक्ष्मीनारायण यांची चांगली कामे ठाणेकरांना पाहावयास मिळाली.

शिवमला मदतीचा हात..

घोडंबदर येथील विजय गार्डन परिसरात शिवम राहतो. तो ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयात शिकतो. लहानपणीच त्याला अंधत्व आले. मात्र, अंधत्वावर मात करून त्याला शिक्षक व्हायचे आहे. ठाणे ते घोडबंदर या मार्गावर धावणारी खासगी बससेवा त्याला महाविद्यालय प्रवासासाठी सोयीस्कर होती. मात्र, ही बससेवा बेकायदा असल्यामुळे लक्ष्मीनारायण यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे ही बस वाहतूक बंद झाली. परिणामी शिवमला महाविद्यालयात जाण्यासाठी टीएमटीचा आधार घ्यावा लागत होता. घरापासून बस स्थानक दूर असल्यामुळे तसेच महामार्गावर बस थांबा असल्यामुळे त्याला अपघाताची भीती वाटायची. यामुळे त्याने थेट लक्ष्मीनारायण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बस सेवा सुरू करण्याची मागणी केली. परंतु लक्ष्मीनारायण यांना कारवाई थांबविणे शक्य नव्हते. तसेच आपल्याच कारवाईमुळे एका होतकरू विद्यार्थ्यांला शिक्षणापासून मुकावे लागत असल्याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनीच पुढाकार घेऊन वाहतूक शाखेच्या माध्यमातून शिवमचा शैक्षणिक प्रवास पूर्ववत केला. गेल्या दोन महिन्यांपासून वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी जुबैर तांबोळी हे त्याला दुचाकीवरून ने-आण करण्याचे काम करीत आहेत.

Story img Loader