सोनसाखळी चोरीचे गुन्हे गंभीर स्वरूपाचे झाल्याचे मान्य करीत या गुन्हय़ांना पायबंद घालण्यासाठी नाकाबंदी, गस्ती वाढविणे यांसह इतर उपाययोजना करण्यात येतात, अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. तसेच सोनसाखळी चोरांविषयी पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने दोन महिन्यांत तीन सोनसाखळी चोरांच्या टोळ्या पकडून त्यांच्याकडून २१६ गुन्हय़ांची उकल केली असून या गुन्हय़ात चोरलेले सुमारे साडेपाच किलो वजनाचे सोने जप्त केले आहे. या व्यतिरिक्तही सोनसाखळी चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्या तुलनेत ही सर्वात मोठी कामगिरी असून त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात सोन्याचे दागिने जप्त करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे, अशी माहितीही पराग मणेरे यांनी दिली. सोनसाखळी चोरीच्या गुन्हय़ात जप्त झालेले दागिने तक्रारदारांचा शोध घेऊन त्यांना न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा देण्यात येतात. अनेकदा चोरलेले दागिने सोनसाखळी चोर वितळवून त्याची लगड तयार करतात. एखाद्या गुन्हय़ात अशी लगड जप्त झाली तर न्यायालयाच्या आदेशानुसार तिचे तुकडे करून तक्रारदारांना देण्यात येतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. झटपट पैसे मिळत असल्याने अनेक चोरटे सोनसाखळी चोरीकडे वळू लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा