ठाणे : रुग्णांच्या शस्त्रक्रिया, अपघात, महिलांना प्रसूतीवेळी रक्ताचा पुरवठा रुग्णालयांना करावा लागतो. यासाठी सरकारी यंत्रणांकडून वेळोवेळी शिबिरांचे आयोजन करून सरकारी रक्तपेढ्यांमध्ये मुबलक असा रक्तसाठा करून ठेवण्यात येतो. मात्र ठाणे जिल्ह्यातील सहा सरकारी रतपेढ्यांमधील साठा कमी झाला असून पुढील १० दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा सध्या सरकारी यंत्रणांकडे उपलब्ध आहे. यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन आता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील विविध महापालिका, पालिका तसेच ग्रामीण भाग येथील लोकसंख्या पाहता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर कायम ताण असल्याचे जाणवते. सर्व सरकारी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, मुख्य जिल्हा रुग्णालय या ठिकाणी रुग्णांची कायमच गर्दी दिसून येते. यामुळे जिल्हा आरोग्य व्यवस्थेला कायमच सतर्क राहावे लागते. यासाठी मुबलक खाटा, रुग्णवाहिका, औषधे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुबलक रक्तसाठा करून ठेवणे सरकारी आरोग्य यंत्रणांचे महत्वाचे काम असते. अनेक महागड्या शस्त्रक्रिया, प्रसूती तसेच मोठे अपघात यांचा खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करणे बहुतांशवेळा अनेक गरजू रुग्णांना आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही. अशावेळी अनेक रुग्णांची धाव ही सरकारी रुग्णालयांकडे असते. या सर्व शस्त्रक्रिया, अपघातावरील उपचार यावेळी प्रामुख्याने रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात येत असतो. यासाठी सरकारी रक्तपेढ्यांमध्ये मुबलक प्रमाणात रक्तसाठा करून ठेवण्यात येत असतो. मात्र ठाणे जिल्ह्यातील हाच रक्तसाठा आता कमी झाला असून जिल्ह्यातील सरकारी रक्तपेढ्यांमध्ये मिळून पुढील १० दिवस पुरेल इतकाचा रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आले आहे. यामुळे येत्या काही दिवसात मुबलक रक्तसाठा न झाल्यास रुग्णांना रक्तसाठी धावाधाव करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चौकट

युवा वर्गाकडून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते. महाविद्यालयीन विद्यार्थी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी असतात. तसेच अनेक सामाजिक संस्था देखील अनेकदा रक्तदान शिबिरांचे आयोजन करत असतात. मात्र सध्या परीक्षांचा कालावधी असून युवा वर्गाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. तर यावेळी उन्हाचा तडाखा अधिक असल्याने अनेक सामाजिक संस्था देखील शिबिरांचे आयोजन करत नसल्याने हवा तस रक्तसाठा झाला नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. याठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन झाल्यास अथवा विविध कंपनी व्यवस्थापनांनी स्वतःहून रक्तदान शिबिरांचे आयोजन केल्यास जिल्ह्यात नियमित स्वरूपात मोठा रक्तसाठा होईल. मात्र या औद्योगिक क्षेत्रातुन रक्तदानासाठी हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. जिल्हा रुग्णालय, उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज कळवा रुग्णालय, कल्याण डोंबिवली महापालिका, नवी मुंबई महापालिका आणि मीरा – भाईंदर महापालिका या सहा ठिकाणी सरकारी रक्तपेढ्या आहेत.

जिल्ह्यातील रक्तसाठ्याची स्थिती पाहता इच्छुक रक्तदात्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी, महाविद्यालयीन तरूण-तरूणींनी स्वेच्छेने रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना मदत करावी. रक्तदान शिबिर आयोजित करावयाचे असल्यास नागरिकांनी 9869685282 या क्रमांकावर संपर्क साधावा.

गिरीश चौधरी, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी

Story img Loader