फुलपाखरं सुरेखच असतात. त्यांच्याकडे बघतच राहावे असे कुणालाही वाटते, पण त्यातही काही फुलपाखरे जास्तच छान दिसतात. अशा जास्त छान दिसणाऱ्या फुलपाखरांपैकीच एक म्हणजे ब्लू पॅन्सी फुलपाखरू

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्लू पॅन्सी हे निम्फेलिडे म्हणजेच ब्रश फुटेड प्रकारातील एक मध्यम आकाराचे, आफ्रिका, दक्षिण आशिया, ऑस्ट्रेलिया एवढय़ा विस्तीर्ण प्रदेशात आढळणारे फुलपाखरू आहे.

निळ्या रंगांच्या छटांचे अद्भुत मिश्रण या फुलपाखरामध्ये पाहता येते. त्याचे पुढचे आणि मागचे दोन्ही पंख कातर कडांचे असतात. शिवाय पंखांच्या किनारीला तीन तीन काळ्या पांढऱ्या समांतर पण तुटक रेषांची किनार असते.

पुढच्या पंखांचा धडाकडचा अर्धा तर मागच्या पंखांचा काही भाग गडद निळ्या रंगाचा असतो. त्यात काही वेळा काळसर छटाही दिसते. पंखांची टोके ही फिक्कट मातकट रंगाची असतात. पंखांच्या टोकाला दोन उभ्या पांढऱ्या  ठिपक्यांनी बनलेले पट्टे असतात, आणि या पट्टय़ांच्या तळाशी डोळ्यासारखा दिसणारा गडद तपकिरी कडा असणारा निळा ठिपका असतो. पुढच्या आणि मागच्या दोन्ही पंखांचा उर्वरित भाग हा गडद आकाशी रंगाचा असतो. मागच्या पंखांच्या या आकाशी रंगावर दोन दोन मोठे तपकिरी बॉर्डर असणारे गर्द निळ्या रंगाचे, डोळ्यांसारखे दिसणारे ठिपके असतात.

ही फुलपाखरे मोकळ्या माळांवर बागडताना दिसतात. आपल्याकडच्या भरपूर पावसाच्या प्रदेशात पावसाळा संपला की, परिसर शुष्क होतो. अशा दोन्ही वातावरणांत ही छान जमवून घेतात. पाणथळ जागांमध्ये उगविणाऱ्या अनेक रानझुडुपांवर फुलपाखरांची मादी अंडी घालते. हे अंडे गोलाकार, वरच्या बाजूस काहीसे चपटे आणि हिरवट रंगाचे असते. अंडे उबवून सुरवंट बाहेर येण्यास तीन दिवस लागतात.

सुरवंटाची वाढ पूर्ण होण्यास १५ ते २० दिवस लागतात. या दरम्यान सुरवंट सहा वेळा कात टाकतो. सुरवंट कोषात शिरून फुलपाखरू म्हणून बाहेर यायला ६ ते ७ दिवस लागतात. या फुलपाखरांच्या अंगावर असणाऱ्या डोळ्यांसारख्या ठिपक्यांमुळे अफिक्रेत यांना आइड पॅन्सी या नावाने ओळखले जाते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blue fancy butterfly