डोंबिवलीकर वन्यजीव छायाचित्रकाराच्या कॅमेऱ्यात बध्द
डोंबिवलीतील प्रसिध्द वन्यजीव छायाचित्रकार दिवाकर ठोंबरे यांनी अरुणाचल प्रदेशातील ‘नामदफा’ अभयारण्यात भ्रमंती करताना कॅमेऱ्यात कैद केलेले एक फूलपाखरु भारतामधील दुर्मिळात दुर्मिळ आणि नवीन प्रजातीमधील पहिलेच फूलपाखरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘ब्लू ग्लासी टायगर’ प्रजातीमधील हे फूलपाखरु असून भारतात ते प्रथमच आढळून आले आहे. यावर ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’तील वन्यजीव अभ्यास तज्ज्ञांनी शिक्कामोर्तब केले आहे.
भारतात एकूण १५१० विविध प्रजातीमधील फूलपाखरे आढळतात. या नवीन फूलपाखराच्या शोधामुळे ही संख्या १५११ झाली आहे, असा दावा केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’तर्फे (बी. एन. एच. एस.) अरुणाचल प्रदेशातील ‘नामदफा’ अभयारण्यात फूलपाखरु निरीक्षण आणि अभ्यास दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात डोंबिवलीतून वन्यजीव अभ्यासक म्हणून दिवाकर ठोंबरे सहभागी झाले होते. ‘नामदफा’ अभयारण्यात ‘बी. एन. एच. एस’ पथकातील फूलपाखरु अभ्यासकांना विविध प्रजाती व प्रकारची १५० हून अधिक फूलपाखरे आढळली. या भ्रमंतीमध्ये दिवाकर यांच्या कॅमेऱ्याने हाल्दीबारी मार्गावरुन जात असताना नाओ दिहिंग नदी किनारी अचूक वेध घेऊन एका फूलपाखराला आपल्या कॅमेऱ्यात टिपले. या फूलपाखराच्या हालचाली, रंगरुप पाहता ते खूप दुर्मिळात दुर्मिळ असल्याचे अभ्यासकांच्या निदर्शनास आले. दौरा संपल्यानंतर दिवाकर ठोंबरे यांनी फूलपाखरु तज्ज्ञ आयझ्ॉक किहीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्मिळ फूलपाखराचा अभ्यास केला. अनेक फूलपाखरु अभ्यासकांशी ठोंबरे या फूलपाखराविषयी चर्चा केली.
दीड ते दोन वर्ष अनेक तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर अरुणाचल प्रदेशातील नामदफा अरण्यात आढळलेले फूलपाखरु हे ‘ब्लू ग्लासी टायगर’ प्रजातीचे असल्याचे शिक्कामोतर्ब करण्यात आले आहे. हे फूलपाखरु थायलंड, म्यानमार या देशांमध्ये प्राधान्याने आढळते. भारत देशामध्ये आढळलेले हे पहिलेच दुर्मिळ फूलपाखरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘ब्लू ग्लासी टायगर’ या दुर्मिळ फूलपाखराची उत्पत्ती, त्याचा संचार, वास्तव्य याविषयीचा अभ्यास करुन दिवाकर ठोंबरे यांनी एक शोधनिबंध लिहिला. ‘बी. एन. एच. एस’ सह अनेक फूलपाखरु अभ्यासकांनी हे फुलपाखरु भारतात पहिल्यांदाच आढळल्याचे स्पष्ट केले आहे.
ठोंबरे यांनी ‘ब्लू ग्लासी टायगर’विषयी लिहिलेला शोध निबंध बी. एन. एच. एस. च्या माहिती पुस्तिकेत प्रसिध्द करण्यात आला आहे.
‘ब्लू ग्लासी टायगर’चा जीवनपट
होस्ट प्लॅन्ट (पाहुणी झाडे) या झाडाचा आधार घेऊन ही फूलपाखरे त्या परिसरात संचार करतात. झाडांची पाने खाऊन तेथेच कोश तयार करतात. तेथे अंडी टाकतात. अंडय़ातून बाहेर पडल्यानंतर कोश फोडून ही फूलपाखरे भ्रमंतीला लागतात. चिंच, रुई, बाभूळ, कडीपत्ता, पेरू, जंगली काही झाडे ही ‘होस्ट प्लॅन्ट’ म्हणून ओळखली जातात. या फूलपाखराचा जीवन प्रवास फक्त अडीच ते तीन महिने असतो. याच प्रजातीमधील काही फूलपाखरे ‘नेचर प्लॅन्ट’ या झाडाचा आधार घेऊन वाढतात. जी फूलपाखरे पाने खाऊ शकत नाहीत ती फूलपाखरे पाने, फुलावरील मध शोषून घेऊन जीवनक्रम करतात. या फूलपाखरांचा जीवनकाळ १५ ते ३ महिन्यांचा असतो, असे दिवाकर ठोंबरे यांनी सांगितले. या फुलपाखरांची भ्रमंती उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे जंगलांचा आधार घेऊन सुरु असते, असे ठोंबरे यांनी स्पष्ट केले.
मागील पाच वर्षांपासून आपण जंगल भ्रमंती करतो. देशाच्या विविध भागातील अभयारण्यांचा प्रवास करुन तेथील वन्यजीवांची छायाचित्रे काढून त्यांचा अभ्यास करतो. या दौऱ्यानंतर फुलपाखरांचा तळमळीने कोणी अभ्यास करीत नसल्याचे आपणास आढळून आले. म्हणून फुलपाखरांची छायाचित्रे काढणे. त्यांचा अभ्यास करण्याचे काम आपण सुरु केले आहे. या अभ्यासातून डोंबिवलीत रोटरी क्लबच्या सहकार्याने फूलपाखरु उद्यान विकसित केले. माथेरान, ऐरोली येथे अशीच उद्याने विकसित करुन दिली आहेत. फूलपाखरांच्या संवर्धनासाठी झाडे लावणे गरजेचे आहे.
– दिवाकर ठोंबरे, वन्यजीव छायाचित्रकार