उत्तर प्रदेशातील मिरझापूर जिल्ह्यातील काही भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसेचे कल्याण ग्रामीणचे आ. प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या छबीची छायाचित्रे लावून बेरोजगारांना घरबसल्या नोकरी देण्याचे आमीष दाखविणारे फलक लावण्यात आले आहेत. आपल्या नावाचा गैरवापर करुन कोणीतरी उत्तरप्रदेशात पैसे उकळण्याचा प्रकार, बेरोजगारांची फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यावर आ. पाटील यांनी ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंग आणि सायबर गुन्हे शाखेकडे मंगळवारी लेखी तक्रार केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>डोंबिवलीत नेहरु रस्त्यावर मोटारींचे वाहनतळ ; नेहरु रस्ता कोंडीच्या विळख्यात

तीन महिन्यापूर्वी मनसेच्या डोंबिवली विभागाने काही उत्तर भाषिक मंडळींना मनसेत प्रवेश दिला आहे. उत्तर भाषिक मनसेचे अनेक कार्यकर्ते डोंबिवलीत सक्रिय झाले आहेत. या राजकीय वातावरणाचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांनी उत्तरप्रदेशात हा गैरप्रकार केला आहे का, याचा तपास मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. पोलिसांच्या विशेष पथकाने या गैरप्रकारचा तपास सुरू केला आहे.

उत्तर प्रदेश आणि जयपूर हद्दीवरील मिरझापूर जिल्ह्यातील लिहिंग पिनंगओ रस्त्यावरील घत्वासन, बुबव्हेरी तालुक्यांच्या परिसरात काही समाजकंटकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे आ. प्रमोद पाटील यांच्या नावाचे फलक लावले आहेत. ‘नटराज गृहपाठ नोकरी’ आणि नटराज कंपनीच्या नावाने लावण्यात आलेल्या फलकांवर मनसेच्या पक्षचिन्ह इंजिनचा वापर करण्यात आला आहे. अखिल भारतीय स्तरावर या कंपनीतून घरच्या घरी पेन्सिल बंदिस्त करण्याचे काम बेरोजगारांना दिले जाते. या कामासाठी दरमहा कामगाराला ३० हजार रुपये वेतन आणि काम सुरू करण्यापूर्वी १५ हजाराचे आगाऊ वेतन दिले जाते, असे उत्तर प्रदेशमधील मिरझापूर भागातील फलकांवरील मजकुरात समाजकंटकाने म्हटले आहे. आपणास पेन्सिल बंदिस्त साहित्य आपल्या घरच्या पत्त्यावर पाठविण्यात येईल. यासाठी ९२१९००७९३३ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> शहापूर : भातसा धरणाच्या कालव्याला भगदाड; लाखो लीटर पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

आ. पाटील यांनी ही जाहिरात केली आहे, हे दाखविण्यासाठी समाजकंटकांनी आ. प्रमोद पाटील यांची भव्य छबी, शीर्षक पत्राचा वापर केला आहे. जाहिरात फलकाच्या शीर्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विनम्र हाताची छबी लावण्यात आली आहे. बेरोजगार घरबसल्या पेन्सिल बंदिस्त काम कसे करतात याची छायाचित्र फलकावर लावण्यात आली आहेत.

आ. पाटील यांना उत्तर प्रदेशातून ही माहिती मिळाल्यानंतर ते अस्वस्थ झाले. आपल्या नावाने उत्तर प्रदेशातून काही जण आर्थिक गैरप्रकार करत आहे हे निदर्शनास येताच आ. पाटील यांनी पोलिसांना पत्र दिली आहेत. ऑनलाईन माध्यमातून सायबर गुन्हे विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.

हा आर्थिक गैरप्रकार करणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आ. पाटील यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Board for unemployed lure to work from home with the picture of mns mla raju patil and pm narendra modi zws