ठाणे : येथील वागळे इस्टेट भागातील किसन नगर परिसरात एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीच्या छतावर एका बाळाचा मृतदेह आढळल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणाची नोंद श्रीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
किसन नगर परिसरात एक इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रूमच्या खिडकीवर दोन ते तीन दिवसाचे बाळ (मुलगा) मृत अवस्थेत पडल्याचे इमारतीच्या रहिवाशांना आढळून आले. त्यांनी या घटनेची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच श्रीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बाळाचा मृतदेह ताब्यात घेतला. बाळाच्या शरीरावर कोणत्याही जखमा दिसून आल्या नसून हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
तसेच पोलिसांनी इमारतीत तसेच आजूबाजूच्या परिसरात कोणती महिला गरोदर होती का याची चौकशी सुरु केली आहे. आसपासच्या दवाखान्यात आणि रुग्णालयात यासंदर्भात विचारणा केली जात आहे. या बाळाची कोणीतरी जाणून बुजून हत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd