डोंबिवली– मागील चार दिवसांपासून येथील कुंभारखाणपाडा खाडीत आपल्या अडीच वर्षाच्या मुलीसह बेपत्ता असलेल्या ४० वर्षीय वडिलांचा मृतदेह सोमवारी दुपारी अग्निशमन दलाच्या गरीबाचापाडा विभागातील जवानांना खाडीत तरंगताना आढळला. जवानांनी मृतदेह खाडीतून बाहेर काढून विष्णुनगर पोलिसांच्या ताब्यात दिला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रूक्मिणीबाई रूग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. त्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
अनिल सुरवाडे असे खाडीत बुडून मरण पावलेल्या रहिवाशाचे नाव आहे. मागील तीन दिवसांपासून विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे, कल्याण डोंबिवली पालिकेच्या गरीबाचापाडा अग्निशमन केंद्राचे प्रमुख रामचंद्र महाला आणि त्यांची पथके कुंभारखाणपाडा, देवीचापाडा, मुंब्रा, कल्याण खाडी परिसरात बेपत्ता अडीच वर्षाची मुलगी आणि तिचे वडील अनिल यांचा शोध घेत होते.
हेही वाचा >>>मेट्रो कारशेडच्या मार्गात नवा अडथळा; घरे बाधित होणार असल्याने विरोध
४८ तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन जवानांना अनिल सुरवाडे यांचा मृतदेह खाडीत आढळला. बेपत्ता मुलीचा शोध तपास पथकांनी सुरूच ठेवला आहे. शनिवारी दुपारी अनिल सुरवाडे आपल्या मुलीला घेऊन कुंभारखाणपाडा खाडी किनारी खेळण्यासाठी घेऊन गेले होते. मुलगी खाडी किनारच्या घाटावरून पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी वडील अनिल यांनी पाण्यात उडी घेतली. पाण्याचा वेगवान प्रवाहात दोघेही वाहून गेले होते.