ठाणे : भिवंडी येथील भादवड भागात अडीच वर्षांच्या मुलाचा मृतदेह स्वच्छतागृहाच्या उघड्या टाकीत आढळला. आयांश जैस्वाल असे मृत मुलाचे नाव असून मागील चार दिवसांपासून तो बेपत्ता होता. या प्रकरणी आता अकस्मात मृत्यूची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आयांश जैस्वाल हा त्याचे आई-वडील, आजी आणि बहिणीसोबत भादवड गावात वास्तव्यास होता. भिवंडीतील सोनाळे परिसरात त्याचे आई-वडिल गोदामात कामाला जातात.

१४ फेब्रुवारीला त्याचे आई-वडील कामाला गेल्यानंतर तो सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. उशीरापर्यंत तो घरी आला नसल्याने परिसरात त्याच्या आजीने शोध घेतला. परंतु तो कुठेही आढळून आला नाही. याप्रकरणी त्याच्या कुटुंबाने शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार, मुलगा बेपत्ता असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शांतीनगर पोलिसांनी मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यावेळी एक महिला संशयास्पदरित्या एका मुलाला तिच्यासोबत घेऊन जात असल्याचे आढळले.

पोलिसांनी तिचा शोध घेतला. परंतु तो मुलगा आयांश नव्हता. त्यानंतर पोलिसांनी घराच्या परिसरात मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली. मंगळवारी सकाळी पोलिसांनी येथील परिसरातील चाळीच्या स्वच्छतागृहाच्या टाकीमध्ये मुलाचा मृतदेह आढळला. ही टाकी उघडी असल्याने तो या टाकीमध्ये पडला असावा असा अंदाज पोलिसांना आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Story img Loader