लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलावात बुडून एका १८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. साहिल घोरपडे असे मृत मुलाचे नाव असून तो मित्रांसोबत पोहण्यासाठी तलावात उतरला होता. मध्यरात्री त्याचा मृतदेह बचाव पथकांनी बाहेर काढला.
वागळे इस्टेट येथील साठेनगर परिसरात साहिल घोरपडे हा तरुण राहत होता. रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास तो मित्रांसोबत रायलादेवी तलावात पोहण्यासाठी गेला होता. परंतु त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पथकांनी अंडरवॉटर टेलिस्कोपिक कॅमेरा आणि थर्मल स्कॅनर या यंत्रणाच्या साहाय्याने साहिलाचा शोध सुरु केला. सुमारे दीड तास त्याचा शोध सुरु होता. परंतु रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. मध्यरात्री १२.३० वाजता पुन्हा तरुणाचा शोध पथकांनी सुरु केला. दोन तास शोधकार्य केल्यानंतर मुलाचा मृतदेह पथकांनी बाहेर काढला. त्याचा मृतदेह पुढील कार्यवाईसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे. साहिल याच्या मृत्यूमुळे साठेनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ठाणे शहर तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरातील विविध भागात तलाव आहेत. उकाडा वाढल्यानंतर आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर या तलावांमध्ये पोहण्यासाठी अल्पवयी मुले, तरुण जात असतात. तलावात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने यापूर्वी अनेक लहान मुले, तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याचे प्रकार यापूर्वी देखील समोर आले होते. आता, पुन्हा एकदा तरुणाचा मृत्यू झाल्याने तलावात पोहण्यापासून अटकाव करण्यासाठी महापालिका केव्हा उपाययोजना करेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.