लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली: कसारा-सीएसएमटी लोकलमध्ये गुरुवारी दुपारी डोंबिवली ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान एका जागरुक प्रवाशाच्या सतर्कतेमुळे एका बोगस तिकीट तपासणीसाला पकडण्यात रेल्वे अधिकाऱ्यांना यश आले. या बोगस तपासणीसाकडे तिकीट तपाणीस असल्याचे रेल्वेचे बनावट ओळखपत्र, भाजपचा दिंडोशी विधानसभा विभागाचा युवा पदाधिकारी असल्याचे ओळखपत्र आढळून आले आहे.

डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात या बोगस तिकीट तपासणीसाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेच्या माध्यम प्रतिनिधींच्या व्हाॅट्सप ग्रुपवर रेल्वे अधिकाऱ्यांनी या तिकिटी तपासणीसाचे तो भाजपचा दिंडोशी विभागाचा युवा पदाधिकारी असल्याचे एक ओळखपत्र प्रसिध्द केले होते. ते शुक्रवारी दुपारी काढून टाकण्यात आले.

हेही वाचा… ठाण्यात रिक्षा उलटून सहा जण जखमी

विजय बहादूर सिंह (२१, रा. गणेशनगर ऐरोली, नवी मुंबई. मूळ गाव जौनपूर, उत्तर प्रदेश) असे या बोगस तपासणीसाचे नाव आहे. बुधवारी दुपारी दिवा, कोपर, डोंबिवली स्थानकांच्या दरम्यान कसारा लोकलने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची तिकिटे विजय सिंह तपासत होता. काही विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसूल करत होता. प्रथम श्रेणी डब्यातील एका जागरुक प्रवाशाला सिंह हे तपासणीस नसल्याचा संशय आला. त्यांनी सिंह यांच्याकडे रेल्वेचे ओळखपत्र, ते कोठे राहतात याची माहिती विचारली. त्यावेळी सिंह याला घाम फुटला. सिंह बोगस तपासणीस असल्याचे समजल्यावर जागरुक प्रवाशांनी त्याला पहिले ठाणे, त्यानंतर दिवा स्थानकात आणले. तेथून त्याला डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

हेही वाचा… ठाणे स्थानकापर्यंतची प्रवाशांची पायपीट बंद, तुळईचे काम पुर्ण झाल्याने रस्ता वाहतूकीसाठी खुला

मुंबईतील मुख्य तिकीट निरीक्षक प्रमोद सरगई यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर सिंह याची खातरजमा पोलिसांनी केली. विजय सिंह नावाचा टीसी नसल्याचे सांगण्यात आले. अंगझडतीत त्याच्याकडे बनावट ओळखपत्र, भाजपचे ओळखपत्र आढळले.

ठाणे लोहमार्ग ठाण्याचे उपनिरीक्षक शंकर पाटील यांनी सिंहची चौकशी केल्यानंतर त्याला प्रथम ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तेथे गुन्हा नोंदविल्यानंतर घटना कोपर ते डोंबिवली स्थानकांच्या दरम्यान घडली असल्याने हा गुन्हा डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्याकडे वर्ग करून पुढील चौकशीसाठी या तोतयाला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. शुक्रवारी आरोपीला रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला अपोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या बोगस टीसीने आतापर्यंत किती प्रवाशांची लूट केली. त्याने अशा पद्धतीने आणखी कुठे गुन्हे केले आहेत का. ओळखपत्र त्याने कुठून बनवून घेतले याची माहिती पोलीस घेत आहेत. डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bogus ticket checker arrested in kasara local dvr
Show comments