जयेश सामंत
ठाणे : मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा गमावल्यानंतर शरद पवार यांची मुंबईसह राज्यभरातील बाजारसमित्यांवर असलेली पकड कमकुवत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रभाव राखून असलेल्या खंद्या पवार समर्थकांची कोंडी करण्यात येत असून गेल्या आठवडाभरापासून मुंबई गुन्हे शाखेने शौचालय घोटाळय़ाप्रकरणी चालवलेल्या कारवाईकडे त्या अंगाने पाहिले जात आहे.

विशेषत: पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील मतदारसंघांत या पवारनिष्ठांकडून पुरवली जाणारी रसद रोखण्यासाठी हे प्रयत्न सुरू असून सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार पक्षाचे उमेदवार आणि माथाडी नेते शशिकांत शिंदे हेही तपासयंत्रणांच्या निशाण्यावर असल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असताना शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यासारख्या दिग्गज नेत्यांच्या मांडवाखाली वावरणाऱ्या अनेक व्यापारी नेत्यांचा या बाजारांवर प्रभाव राहिला आहे. शशिकांत शिंदे, रवींद्र इथापे, संजय पानसरे, अशोक वाळुंज, अशोक गावडे, शंकर पिंगळे, बाळासाहेब बेंडे, नरेंद्र पाटील, विलास हांडे, अशोक हांडे यासारख्या व्यापारी, माथाडी असलेल्या मात्र पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांवर काही प्रमाणात प्रभाव राखणाऱ्या नेत्यांचा या बाजारांवर अंकुश असल्याचे पाहायला मिळते. राज्यभरातून या बाजार समितीवर शेतकरी गटातून १६ संचालक निवडून येतात. मात्र हजारो कोटी रुपयांच्या उलाढालीचे केंद्र असणाऱ्या या बाजारांवर मुंबईतील पाच आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या रूपाने एक माथाडी अशा सहा संचालकांचा दबदबा असल्याचे नेहमीच राहिला आहे.

हेही वाचा >>>कल्याण: कोपर रेल्वे स्थानकाजवळील कोंबड्याचा खुराडा तोडण्याचे आदेश

 या बाजारपेठांमध्ये काही वर्षांपूर्वी स्वच्छतागृहांच्या उभारणीचे कंत्राट दिले गेले. या कंत्राटात घोटाळा झाल्याच्या तक्रारी केल्या गेल्या होत्या. शशिकांत शिंदे यांच्यासह बाजार समितीमधील अधिकारी आणि इतरही काही संचालकांविरोधात तक्रारी पुढे आल्या होत्या. मात्र सुरुवातीला याकडे कुणी ढुंकूनही पाहिले नाही. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार आणि सातार लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान उमेदवार शशिकांत शिंदे थोरल्या पवारांसोबत राहिले आणि येथील राजकीय गणिते बदलल्याचे पाहायला मिळते. 

शशिकांत शिंदे हेच लक्ष्य?

राज्यातील शिरूर आणि सातारा या दोन लोकसभा मतदारसंघांवर प्रभाव पाडणाऱ्या व्यापाऱ्यांचा एक मोठा टक्का मुंबईतील या बाजारात आहे. या दोन्ही जिल्ह्यातील साखर कारखाने, बागायती पट्टय़ांवर या व्यापाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे. अमोल कोल्हे आणि शशिकांत शिंदे यांना हवी ती रसद या बाजारांमधून पुरवली जात असल्याच्या तक्रारी त्यांचे विरोधक करू लागले होते. सातारा मतदारसंघात तर शौचालय घोटाळय़ावरून शशिकांत शिंदे यांचे विरोधक असलेले माथाडी नेते नरेंद्र पाटील जाहीर वक्तव्य करत होते. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने या बाजारातील तगडे व्यापारी संजय पानसरे यांना अटक करताना अशोक वाळुंजे आणि शंकर पिंगळे यांचीही चौकशी केल्याचे समजते. शिरूर, साताऱ्याची थोरल्या पवारांची रसद तोडण्याची खेळी यानिमित्ताने खेळली गेल्याची  चर्चा आता या बाजारात सुरु झाली आहे.

Story img Loader