कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील शिळ रस्त्यावरील गोळवली येथील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील शुभारंभ बॅन्क्वेट हॉल ही तीन माळ्याची बेकायदा इमारत २२ ऑगस्टपर्यंत जमीनदोस्त करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती कमल खट्टा यांनी कल्याण डोंबिवली पालिकेला दिले. पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्याचे आदेश देण्याचा सपाटा न्यायालयाने लावल्याने भूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण-शिळ रस्त्यावरील गोळवली गाव हद्दीत व्यंकटेश पेट्रोल पंपाच्या बाजुला मदन गुप्ता भूमाफियाने काही वर्षापूर्वी तीन माळ्याची वाणिज्य वापरासाठी बेकायदा इमारत उभारली. या इमारतीच्या उभारणीसाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या घेण्यात आल्या नाहीत. निर्माणाधिन या बेकायदा इमारतीवर कारवाई करावी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या प्रिती कुथे तीन वर्षापासून पालिका आयुक्त, उपायुक्त, आय प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त राजेश सावंत, संजय साबळे यांच्याकडे पाठपुरावा करत होत्या. साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांनी भूमाफिया मदन गुप्ता यांना बांधकाम परवानगीची सादर करणे, ही इमारत अनधिकृत घोषित करणे याव्यतिरिक्त ही इमारत जमीनदोस्त करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. गुप्ता हे पालिकेच्या सुनावणीला कधीही हजर राहिले नाहीत. गुप्ता याने अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तीन माळ्याचे बेकायदा बांधकाम पूर्ण केले. या इमारतीच्या तळ मजल्याला नवीन वाहन विक्रीचे प्रदर्शनी दालन, पहिल्या माळ्यावर शुभारंभ बॅन्क्वेट हॉल, दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यावर लॉजिंग बोर्डिंग आहे.

पालिकेकडे तक्रारी करूनही आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त साबळे शुभारंभ बॅन्क्वेट हॉल इमारत जमीनदोस्त करत नसल्याने याचिकाकर्ता प्रिती कुथे यांनी मुंबई उच्च न्यायालयात या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दोन वर्षापूर्वी दाखल केली. याचिकाकर्त्या प्रिती कुथे यांच्या वतीने ॲड. निखील वाजे यांनी न्यायालयासमोर गुप्ता यांची इमारत कशी बेकायदा आहे हे कागदोपत्री स्पष्ट केले. याप्रकरणाच्या सुनावण्यांना भुमाफिया मदन गुप्ता हजर राहिला नाही. न्यायालयाने पालिका, याचिकाकर्त्याचे वकील ॲड. वाजे, पालिका वकील ॲड. संदीप शिंदे यांची बाजू ऐकून शुभारंभ हॉल बेकायदा इमारत आदेश दिल्यापासून (२४ जुलै) चार आठवड्यात म्हणजे २२ ऑगस्टपर्यंत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले.

साबळेंच्या कालावधीत बेकायदा

साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांनी ज्या पालिका प्रभागांमध्ये साहाय्यक आयुक्त म्हणून काम केले. त्या प्रभागांमध्ये त्यांनी बेकायदा इमारती उभारणाऱ्या भमाफियांना नोटिसा देण्याव्यतिरिक्त तोडकामाची कधीच कारवाई केली नाही, गुप्ता यांच्या इमारतीला साबळेंचे आशीर्वाद होते, असे याचिकाकर्त्याने सांगितले.

गोळवलीतील शुभारंभ बॅन्क्वेट हाॅल इमारत बेकायदा असल्याने उच्च न्यायालयाने ती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची प्रत याचिकाकर्ता पालिका आयुक्तांना देऊन ही बेकायदा इमारत न्यायालय आदेशाप्रमाणे जमीनदोस्त करण्याची मागणी करणार आहे. – ॲड. निखील वाजे, याचिकाकर्ता वकील, मुंबई उच्च न्यायालय.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court order kdmc to demolish illegal building in dombivli zws