नक्षत्रवृक्ष किंवा आराध्यवृक्ष ही खूपच प्रभावी संकल्पना आणि त्याची आराधना ही प्रभावी कृती आहे. मात्र ती प्रत्यक्षात आणायला हा वृक्ष कुंडीत कसा लावायचा असा प्रश्न पडतो, पण कुंडी ही कोणत्याही प्रकारच्या झाडासाठी वज्र्य नाही. पुढे वृक्ष म्हणून होणाऱ्या अर्थात खूप मोठय़ा होणाऱ्या झाडाला आपण कुंडीत लावून त्याची योग्य जोपासना करू शकतो.
नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या मोठय़ा वृक्षाचे कुंडीतील छोटे रूप म्हणजे बोनसाय अर्थात मराठीत वामनवृक्ष. बोनसाय हा जपानी शब्द असून, ‘बोन’ म्हणजे ‘ट्रे’ किंवा उथळ भांडे आणि साई म्हणजे रोप. बोनसायच्या रूपात एखाद्या मोठय़ा वृक्षाची छोटी प्रतिकृती अर्थात वामनवृक्ष तयार करणे ही एक कला आहे आणि त्याचे तंत्रसुद्धा आहे. हे तंत्र वापरून आपण आराध्यवृक्ष कुंडीत वाढवू शकतो.
तुळशीची पूजा करताना सर्वाचा हा अनुभव आहे की, तुळशीचे मोठे झुडूप असो किंवा १५-२० पानं असलेलं रोप असो, तुळशीच्या आराधनेत/ पूजेत फरक पडत नाही. तसेच एरवी मोठा होणारा आराध्यवृक्ष कुंडीत लावून छोटय़ा स्वरूपात असला तरी आराधनेत काही फरक पडू नये. आराधनेसाठी आपल्या आराध्यवृक्षाचे रोप कुंडीत लावून किंवा बीपासून रोप कुंडीतच तयार करून त्याचा आकार नेहमीसारखी छाटणी करून मर्यादित ठेवू शकतो. त्यासाठी बोनसायच्या तंत्राची आवश्यकता नाही. कालांतराने कुंडीतील झाड योग्य ठिकाणी जमिनीत लावून आपण कुंडीत नवीन रोप लावू शकतो. यामुळे वृक्ष संवर्धनासाठीही मदत होईल.
बोनसायविषयी बरेच गैरसमज आढळतात. बोनसाय म्हणजे झाडाचे विकृतीकरण असे काही जणांना वाटते, परंतु कुंडीत ते झाड नैसर्गिकरीत्याच वाढत असते. फक्त उपलब्ध जागेनुसार त्याची वाढ मर्यादित ठेवली जाते. मात्र यामुळे अनेक वृक्ष आपण छोटय़ाशा जागेत सामावू शकतो. (हा एक मोठाच फायदा होतो). दुर्मीळ झाडे जतन करण्यासाठी तर हा अतिशय योग्य पर्याय आहे. यात झाडाला फळे, फुले येतातच, शिवाय एरवी वृक्षावरील जी फुले खूप दुरून बघावी लागतात, ती अगदी जवळून निरीक्षणास उपलब्ध होतात. आराध्यवृक्ष कुंडीत वाढवण्यासाठी ‘बोनसाय’ हा एक पर्याय होऊ शकतो.
झाडांजवळ मैत्री ते आराधना असा प्रवास आतापर्यंत या लेखमालेतून झाला. झाडांच्या सान्निध्यात काम करताना स्फूर्ती, प्रसन्नता, शांतता याचा अनुभव सर्वानाच येतो. निव्र्याज आणि अखंड देत राहाणं- मग ते फूल, पानं, औषध, सावली अशा वेगवेगळ्या स्वरूपांत असेल. यामुळे झाड स्फूर्तिस्थानच राहत नाही तर श्रद्धास्थानही बनतं. १ जुलैपासून सुरू होणाऱ्या वन महोत्सवात प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलून एक आराध्यवृक्ष जमिनीवर आणि एक आपल्या गृहवाटिकेत नक्की लावावा.
drnandini.bondale@gmail.com