डोंबिवली : डोंबिवलीमध्ये येत्या रविवारी (ता. २७) बुक स्ट्रीटचे पै फ्रेन्डस लायब्ररी आणि डाॅ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजकांनी रविवारचा बापुसाहेब फडके रस्त्यावर होणारा बुक स्ट्रीटचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

पै फ्रेन्डस लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांनी ही माहिती दिली आहे. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधुन पै फ्रेन्डस लायब्ररी आणि डाॅ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांनी रविवारी (ता. २७) बुक स्ट्रीटचे आयोजन केले होते. बापुसाहेब फडके रस्त्यावरील या कार्यक्रमात इंदिरा चौक ते आप्पा दातार चौक या चारशे मीटरच्या पट्ट्यात एक लाखाहून अधिक प्रकारची विविध प्रकारची पुस्तके मांडण्यात येणार होती. वाचन संस्कृती वाढावी हा या बुक स्ट्रीट मागील मुख्य उद्देश होता. पहाटे पाच ते सकाळी दहा अशी बुक स्ट्रीटची वेळ होती. कडक उन्हाळ्याचा विचार करून आयोजकांनी बुक स्ट्रीटची सकाळची वेळ ठेवली होती.

या बुक स्ट्रीटमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आयोजकांकडून एक कुपन देण्यात येणार होते. हे कुपन घेऊन नागरिक बुक स्ट्रीटमध्ये गेला की त्याला त्याच्या आवडीचे एक पुस्तक मोफत मिळणार होते. विदेशातील ही बुक स्ट्रीटची संकल्पना संचालक पुंडलिक पै यांनी डोंबिवलीत राबविण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या वर्षी पहाटे साडे चार वाजल्यापासून नागरिक या उपक्रमात सहभागी झाले होते. दुसऱ्या वर्षी आठ हजार नागरिक सहभागी झाले होते. बापुसाहेब फडके रस्त्यावर पसरून ठेवण्यात आलेली एक लाख पुस्तके म्हणजे पुस्तकांची जत्राच वाटते.

डोंबिवली, ठाणे, बदलापूर, भिवंडी, टिटवाळा, नवी मुंबई परिसरातील वाचनप्रेमी नागरिक आवर्जून सहभागी होतात. यावेळी गेल्या दोन महिन्यापासून बुक स्ट्रीट उपक्रमाची तयारी करण्यात आली होती. आय लव्ह बुक्स अशी पुस्तकांची भव्य प्रतिकृती फडके रस्त्यावर उभी करण्यात येणार होती. आयोजनाची अंतीम तयारी सुरू असतानाच पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला. प्रत्येकाला चटका लावणाऱ्या या घटना आहेत. त्यामुळे पीडित कुटुंबीयांच्या दुखात प्रत्येक नागरिक सहभागी आहे. मृत पर्यटकांना श्रध्दांजली म्हणुन बुक स्ट्रीटचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका, वाहतूक विभाग, डोंबिवली, रामनगर पोलिसांनी या उपक्रमाला सहकार्य देण्याची तयारी केली होती.