लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके रस्त्यावर २७ एप्रिल रोजी पहाटे पाच ते सकाळी १० या वेळेत बुक स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विषयांवरील एक लाख पुस्तके या उपक्रमानिमित्त फडके रस्त्यावर मांडण्यात येणार आहेत. वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी, वाचकांना मनाजोगी पुस्तके एकाच व्यासपीठावर उपलब्ध व्हावीत हा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश आहे, असे पै फ्रेन्डस लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांनी सांगितले.
पै फ्रेन्डस लायब्ररी आणि डाॅ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. पुस्तकांपासून साकारलेली ‘आय लव्ह बुक्स’ ही प्रतिकृती यंदाच्या बुक स्ट्रीटचे विशेष आकर्षण असणार आहे. फडके रस्त्यावरील हा उपक्रम पूर्ण निशुल्क आहे. या उपक्रमात प्रवेश देण्यासाठी आयोजकांकडून रसिक वाचकांना एक मोफत कुपन दिले जाणार आहे. हे कुपन घेऊन वाचक बुक स्ट्रीटमध्ये सहभागी झाला की त्याला या कुपनच्या माध्यमातून बुक स्ट्रीटमधील कोणतेही एक आवडीचे पुस्तक निवडीची मुभा असणार आहे, असे संयोजक पुंडलिक पै यांनी सांगितले.
टिळक रस्ता भागातून वाचकांना बुक स्ट्रीटमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे. कडक उन्हाळा विचारात घेऊन २७ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजल्यापासून बुक स्ट्रीट उपक्रमाला उद्घाटनानंतर सुरूवात होणार आहे. गेल्या वर्षी फडके रस्त्यावर बुक स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी साडे चार वाजल्यापासून काही वाचकप्रेमी नागरिक आपणास बुक स्ट्रीट उपक्रमात प्रवेश मिळावा म्हणून रांगेत उभे होते. दुसऱ्या वर्षी आठ हजार वाचक या पुस्तक महोत्सवात सहभागी झाले होते. विदेशातील ही बुक स्ट्रीटची संकल्पना डोंबिवलीत पै फ्रेन्डसच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
बापूसाहेब फडके रस्त्यावरील आप्पा दातार चौक ते इंदिरा चौक दरम्यान रस्त्यावर, पदपथावर विविध प्रकारच्या पुस्तकांची मांडणी केली जाते. रस्त्यावर पसरलेली ही पुस्तके पाहून पुस्तकांची जत्रा फडके रस्त्यावर भरली आहे असा भास होतो. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन, डोंबिवली वाहतूक विभाग, रामनगर पोलीस यांनी पूर्ण सहकार्य देण्याची तयारी दर्शवली आहे. या बुक स्ट्रीटच्या दिवशी फडके रस्त्याकडे येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.