मिलिंद आमडेकर, लेखक, गिर्यारोहक
वाचन हे विचारांचं ध्यान आहे. त्यामुळे चांगल्या विचारांचा जन्म हा सुयोग्य वाचनातून होतो. मी ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काम करीत असताना माझे तीन-चार मित्र खूप वाचन करायचे. त्यामुळे या मित्रांच्या संगतीने मलाही वाचनाचा छंद जडला. रीतसर ग्रंथालयाचा सभासद होऊन मी नियमितपणे वाचू लागलो. अगदी सुरुवातीपासूनच मी स्वत:ला विशिष्ट प्रकारच्या साहित्य वाचनात गुंतवून ठेवले नाही. जे जे उत्तम, अभिजात आहे, ते मी वाचत गेलो. त्यामुळे समतोल दृष्टिकोन होण्यास मदत झाली.
प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते, हे मला कळू लागले. कथा, कादंबरी, ऐतिहासिक, आत्मचरित्र, विज्ञान, प्रवास वर्णन अशी सर्व प्रकारची पुस्तके मी वाचतो. नव्या-जुन्या पिढीतील अनेक लेखकांचे लेखन मला आवडते. त्यांची लेखनशैली, विषय मांडण्याची पद्धत याची मी माझ्या मनात नोंद घेत असतो. माझे सर्वात आवडते लेखक व्यंकटेश माडगूळकर. व्यंकटेश माडगूळकरांची वावटळ, बनगरवाडी यांसारखी अनेक पुस्तके माझ्या संग्रहात आहेत. मराठी साहित्यातील व्यक्तिचित्रणात्मक लिखाणाचे दालन माडगूळकरांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने समृद्ध केले आहे. नुकतेच मी निरनिराळ्या देशांतील तेल उत्पादनासंबंधित गिरीश कुबेर यांनी लिहिलेले ‘एका तेलियाने’ हे पुस्तक वाचले. तसेच विज्ञानविषयक डॉ. उज्ज्वला दळवी यांचे ‘जेनेटिक्स कशाशी खातात’. हे पुस्तक वाचून काढले. सध्या मी अनेक शिखरे पादाक्रांत केलेल्या गिर्यारोहिका ‘जरलैंड काल्टन’ यांचे ‘माउंटन इन माय हार्ट’ हे पुस्तक वाचत आहे.
सध्या माझ्या घरात एकूण पाच हजारांहून अघिक पुस्तकांचा संग्रह आहे. त्या सर्व पुस्तकांसाठी घरात स्वतंत्र दालनच आहे. तीच आमची अभ्यासिकाही आहे. इतिहास, निसर्ग, अध्यात्म आदी विषयांनुसार पुस्तकांची मांडणी करण्यात आली आहे. माझी स्वत:ची १९ पुस्तके प्रसिद्ध आहेत. संग्रही असलेलं कर्नल श्याम चव्हाण यांचं ‘वॉलंग-एका युद्धकैद्याची बखर’ हे त्यांची स्वाक्षरी असलेलं पुस्तक मी कुणाला तरी वाचायला दिले होते. त्यांनी ते काही मला पुन्हा परत आणून दिले नाही. मलाही मी नेमके कुणाला पुस्तक दिले हे आता आठवत नाही. अशा हरविलेल्या अमूल्य पुस्तकांविषयी हुरहुर लागून राहते. कारण काही पुस्तके आता आऊट ऑफ प्रिंट आहेत. काही पुस्तके नव्याने मिळतात. मात्र लेखकाची स्वाक्षरी, त्या पुस्तकातील इतर नोंदी पुन्हा मिळत नाहीत. देशभर माझी भटकंती सुरू असते. ज्या ठिकाणी मी जातो, त्या ठिकाणाहून मी एखादं पुस्तक हे वाचनासाठी आणतोच. जसं एकदा मला हेनरिच हॅरर यांचं ‘सेव्हन इयर्स इन तिबेट’ हे पुस्तक फुटपाथवर पाच रुपयांना मिळालं. तसेच नॉबर्ट कास्टा रेट यांचं ‘टेन इयर अन्डर द अर्थ’ हे पुस्तकही अविस्मरणीय असे आहे. या पुस्तकात दहा वर्षांत सुमारे आठशे नैसर्गिक गुहा कशा शोधून काढल्या याचे वर्णन आहे. प्रत्येक व्यक्तीने संदर्भासाठी वाचन हे केलेच पाहिजे. मी व. पु. काळे , पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, गो.नी.दांडेकर या सर्व लेखकांची अनेक पुस्तके वाचली आहेत. मला पुस्तक प्रत्यक्ष हातात घेऊन वाचायला तर आवडतंच, परंतु त्याचसोबत मी सध्या किंडलही वापरतो. कारण या एका यंत्रात आपण अनेक पुस्तके सेव्ह करू शकतो. त्यामुळे त्याचा खूप फायदा होतो. नव्या पिढीने जास्त आणि वेगवेगळं असं वाचायला हवं. जेणेकरून त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावतील.