नीरजा,लेखिका
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विचार प्रगल्भ होण्यासाठी वाचन अपरिहार्य आहे. वाचन हे असे एकमेव अस्त्र आहे, जे तुमच्या सर्व वाईट विचारांचा नाश करते. तुम्हाला सर्वागाने समृद्ध बनवते. मी चौफेर वाचन करते. मला कथा, कादंबरी, कविता यासारख्या निरनिराळ्या साहित्य प्रकारांतील पुस्तके वाचायला आवडतात. मी दिवसाला किमान एकतरी छोटे पुस्तक वाचते. वाचनाचा हा वारसा मला घरातूनच मिळाला. माझे वडील म. सु. पाटील हे ज्येष्ठ समीक्षक होते. लहानपणी वडील खाऊ म्हणून माझ्या हातात नेहमी पुस्तकच द्यायचे. अगदी अक्षर ओळख झाल्यापासून मी पुस्तके वाचत आहे. लहानपणी वडील नेहमी कोणत्या ना कोणत्यातरी विषयावरील एक नवे पुस्तक वाचायला देत. लहानपणी ग्रंथालयातून सकाळी एक पुस्तक आणायचे आणि ते दुपारी परत करायचे. त्यानंतर पुन्हा एक नवीन पुस्तक आणायचे आणि रात्री ते ग्रंथालयात परत करायचे हा माझा नित्यक्रम होता. सुरुवातीला मी चि. वि. जोशी, सानेगुरुजी, अरेबियन नाइट्स, इसापनीतीतील गोष्टी वाचल्या.
इयत्ता आठवीपर्यंत मी शरदचंद्र चॅटर्जीची अनेक नाटके वाचून काढली. वाचनासाठी मला मुळात वेळ काढावा लागतच नाही. कारण वाचन ही मी माझी सवय मानते. वाचन हे माझ्या दिनचर्येचा एक भाग आहे. घरी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा तेव्हा मी वाचन करते. तसेच बाहेर असल्यावर, रेल्वेमध्ये येता-जाता प्रवासात मी वाचन करते. सध्या माझ्या राहत्या घरात सात ते आठ लहान मोठे बुकशेल्फ आहेत. दोन हजारांहून अधिक निरनिराळ्या साहित्यातील पुस्तकांचा त्यात संग्रह आहे. घरात जागा अपुरी पडत असल्याने वाचून झालेली पुस्तके मी ग्रंथालयांना भेट देते. मला पुस्तक शेअर करायला आवडतात. जसे आपण एकमेकांना आपले विचार किंवा घडलेल्या घटना ऐकवत असतो. त्याचप्रमाणे आपण पुस्तकेही शेअर करायला हवीत. मी माझ्या नातेवाईकांना, मित्र-मंडळींना पुस्तके शेअर करते. त्याचप्रमाणे त्यांनी अमुक एखादे पुस्तकंच का वाचावे याबद्दलही सांगते. मी एम. ए. ला असताना इंग्रजी भाषेतील व साहित्यातील अनेक पुस्तके वाचून काढली. त्यातील अल्बर्ट कामू या लेखकाची ‘स्ट्रेंजर’ ही कादंबरी माझी सर्वात आवडती आहे.
मी पुस्तकांची खूप काळजी घेते. कुणाला पुस्तके दिली तर ती कोणत्या तारखेला दिली हे सर्व मी कॅलेंडरवर नमूद करून ठेवते. लहानपणी मी एकदा पुस्तक दुमडून वाचत होते. ते पाहून बाबा मला ओरडले. ‘पुस्तक दुमडून वाचणे हा त्या पुस्तकाचा अपमान आहे ’ असे मला त्यांनी सांगितले. पुस्तक हे अलगद फुलाच्या पाकळीसारखं धरून वाचायला हवं, असा त्यांचा आग्रह असायचा. तेच संस्कार पुढे माझ्यावर झाले. मी शाळेत असताना शेवटच्या बाकावर बसून अनेक पुस्तके वाचायचे. परीक्षांच्या काळातही अभ्यासातील वाचनापेक्षा अवांतर वाचन करायचे. आता माणूस अनेक नात्यांमध्ये गुंतलेला आहे. वाचनातून नातीही उलगडत जातात. वाचनामुळे माणूस घडतो. त्याची सामाजिक आणि वैचारिक बैठक पक्की होते. मला प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन वाचायला अधिक आवडतं. नव्या पानावर हात फिरवून वाचणं हे मला खूप छान वाटतं. महाविद्यालयात सुट्टीनंतर वर्ग भरले की मी शिकविण्याआधी मुलांना कोणते नवे पुस्तक वाचले हा प्रश्न विचारते. तरुणांनी आज सक्सेस स्टोरीबरोबर वैचारिकही वाचायला हवे. विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनीही वाचायला हवे. सध्या पुस्तक प्रदर्शनांमधून मोठय़ा प्रमाणात फक्त खाद्यपदार्थ व सक्सेस स्टोरीज याविषयावरील पुस्तके पाहायला मिळतात. इतरही पुस्तके प्रदर्शनात असायला हवीत. मी अल्बर्ट कामू यांचे आऊटसायडर, टी. एस. इलिएट यांचे वेस्ट लँड, टॉलस्टॉय यांचे अॅना कॅरेनिना, शरदचंद्र चटर्जी याचे श्रीकांत, शेषप्रश्न इत्यादी कादंबऱ्या, मर्ढेकर व सदानंद रेगे यांच्या कविता, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, मोहन राकेश यांची नाटके वाचली. जी. ए. कुलकर्णीचे सांजशकुन, काजळमाया, रमलखुणासारखे कथासंग्रह, डोस्टोव्हस्कीच्या इडियट, क्राइम अॅण्ड पनिशमेंटसारख्या कादंबऱ्या. बलुतं, उपरा, उचल्या, बंध अनुबंध सारखी आत्मचरित्रे, कमल देसाई, गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे यांसारख्यांचे कथा, कादंबरी लेखन वाचले.