अंगद म्हसकर
वाचनाची आवड असणाऱ्या व्यक्तीला साधारणत: लहानपणापासून उत्तम वाचनाची आवड असते. माझ्या बाबतीत असे झाले नाही. शालेय वयात माझ्याकडून खूप वाचन झाले नाही. मला मुळात अभ्यासाची फारशी गोडी नव्हती. अभ्यासापेक्षा इतर कलात्मक गोष्टी करण्याकडे कल होता. त्यामुळे अभ्यासासाठी खूप वाचन मी शाळेत असताना केले नाही. मात्र वयाच्या वीस-बावीस वर्षांच्या काळात वाचनाची गरज निर्माण झाली. या काळात अभिनय क्षेत्रात माझे पदार्पण झाले. अभिनय करण्यासाठी, भूमिका समजून घेण्यासाठी वाचनाला सुरुवात केली. मी पहिले वाचलेले पुस्तक म्हणजे भालचंद्र नेमाडे यांचे ‘कोसला’. तेव्हापासून वाचनाला सुरुवात झाली. एका विशिष्ट साहित्य प्रकारात मी रमत नाही. कोणत्याही प्रकारचे साहित्य वाचायला मला आवडते.
हर तऱ्हेचे साहित्य वाचतो. मात्र काव्य हा साहित्य प्रकार मी वाचत असलो तरी फार आवडीने वाचत नाही. तरीही संदीप खरे यांचा ‘मौनाची भाषांतरे’ हा काव्यसंग्रह मला खूप भावला. दोन ते तीन वेळा मी तो वाचला. अरुण म्हात्रे, गुलजार यांच्या कविता वाचतो. वाचनामुळे आपल्या स्वभावात काही बदल होतो का हे मी कधी पडताळून पाहिले नाही. याचे कारण असे की आपण जे वाचतो त्याचे संस्कार आपल्यावर होत असतात. जे बदल होतात ते अर्थात वाचनामुळे झालेले असतात आणि ते बदल चांगले होतात, असा माझा विश्वास आहे. ‘झिम्मा’ ‘लमाण’अशी पुस्तके वाचली. सिद्धार्थ पारधे यांचे ‘कॉलनी’ हे पुस्तक मला खूप आवडले. डॉ. रवी बापट यांचे ‘वॉर्ड नं. पाच केईएम’ हे पुस्तक वाचले. प्रकाश नारायण संत यांचे ‘पंखा’ हे पुस्तक आवडले. वेगवेगळ्या विषयांवरील कथांचा संग्रह या पुस्तकात आहे. डॉ. गिरीश जखोटिया यांचे ‘वंश’ हे पुस्तक वाचले. ‘इडली, ऑर्किड आणि मी’ या विठ्ठल कामत यांच्या पुस्तकाचा खूप प्रभाव माझ्यावर पडला. प्रा. नितीन आरेकर यांनी अरुण शेवते यांचे ‘ऐवज’ हे पुस्तक मला भेट दिले. सचिन तेंडुलकर, शोभा गुर्टू, मंगेश पाडगावकर, किशोरी आमोणकर, निळू फुले अशा अनेक नामवंतांची ओळख या पुस्तकात एकत्रित केली आहे. या नामवंतांचे आयुष्य, मेहनत पाहून प्रभावित झालो. स्वत:मध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी अशा पुस्तकांचा नेहमीच उपयोग होतो. डॉ. प.वि. वर्तक यांचे ‘वास्तव रामायण’, ‘पुनर्जन्म’ ही पुस्तके वाचली. वयानुसार वाचनात बदल झाला. पूर्वी जे विषय वाचायचा कंटाळा येत होता तेच अभिनयासारख्या क्षेत्रात आल्यावर आवडीने वाचायला लागलो. वैचारिक लिखाण फारसे वाचत नाही. गोपाळ गोडसे यांचे ‘पंचावन्न कोटींचे बळी’ हे पुस्तक वाचले. विश्वास पाटील यांचे ‘महानायक’, ‘पानिपत’, द. ग. गोडसे यांचे ‘मस्तानी’, गिरीश कुबेर यांचे ‘एका तेलियाने’, रवींद्र भट यांचे ‘हेचि दान देगा देवा’, विश्राम बेडेकर यांचे ‘एक झाड दोन पक्षी’, गोडसेचे‘गांधी हत्या आणि मी’, गोनीदांचे ‘माचीवरला बुधा’, वसंत पोतदार यांचे‘भीमसेन’, पु.ल देशपांडे यांचे ‘अपूर्वाई’ अशी पुस्तके वाचली.
शब्दांकन- किन्नरी जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा