शारदा राऊत, पोलीस अधीक्षिका, पालघर
(सध्या पालघर जिल्ह्य़ाच्या पोलीस अधीक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या शारदा राऊत या २००५ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्या घरी पुस्तकांचा अफाट संग्रह आहे. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातही त्यांनी वाचनाची आवड जोपासली आहे हे विशेष. त्यांच्या मते पुस्तके केवळ ताण घालवत नाहीत, तर सकारात्मक प्रेरणा देतात.)
घरातून वाचनाचे बाळकडू मिळाल्याने शाळेत असल्यापासून मला वाचनाची आवड लागली. शालेय पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचनही होत होते. त्यामुळे वाचनाचा वेग निरंतर वाढत गेला. शालेय जीवनातून झालेल्या वाचनामुळे माझी अभिजात साहित्याशी नाळ जोडली गेली. पुलं देशपांडे, कुसुमाग्रज, वि.स. खांडेकर यांच्या साहित्यांतील गोडी चाखत असताना नामदेव ढसाळ यांच्या स्फुरण चढवणाऱ्या व अंतर्बाह्य़ हेलावून टाकणाऱ्या कविता आणि लेखन मनात भिनलं. महाविद्यालयात असताना यूपीएससीची तयारी करायचं ठरवलं होतं. त्यामुळे प्रचंड अभ्यास होता; पण त्या काळातही अभ्यास करताना अवांतर वाचन सुरू होतं. त्या काळात माझी फुले, आंबेडकरांच्या साहित्यांशी ओळख झाली. आंबेडकर ‘व्हॉल्यूम्स’ मी आत्मसात केले. ‘शेतकऱ्यांचा आसूड’, ‘गुलामगिरी’ हे ग्रंथ महाविद्यालयीन जीवनातच वाचून काढले. या थोर विचारवंतांच्या वाचनामुळे माझी वैचारिक बैठक पक्की होत गेली. वास्तव जीवनातले मर्म उलगडत गेले. आंबेडकरांचं लेखन जीवनावर प्रभाव टाकणारं ठरलं. जीवनाची दिशा मिळाली. महात्मा फुले यांच्या साहित्यानेही प्रभाव टाकला.
महाविद्यालयात असताना माझं वैचारिक वाचन सुरू होतंच, पण तरी कुठल्याही एका प्रकारच्या पुस्तकांच्या चाकोरीत मी अडकले नाही. यूपीएससीची तयारी करत असताना प्रेरणा देणारी पुस्तकं वाचण्याकडे ओढा होता, कारण त्या वयात आणि विद्यार्थी असताना मनाचं खच्चीकरण होतं, निराशा येते. अशा वेळी सकारात्मक विचार देणाऱ्या पुस्तकांची गरज असते. त्यामुळे प्रेरणादायी विचार निर्माण करणाऱ्या पुस्तकांवर मी भर दिला. शिव खेरा यांच्या ‘यू कॅन विन’ या पुस्तकापासून जगभरात गाजलेली प्रेरणादायी बेस्ट सेलर पुस्तकं मी वाचू लागले. मी सध्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हे पुस्तक वाचतेय. दररोज रात्री पुस्तकाची किमान पाच ते सहा पानं वाचल्याशिवाय झोपूच शकत नाही. पुस्तकं सकारात्मक प्रेरणा देतात. ही पुस्तकांमधली जादू आहे. आमचा दिवस हा गुन्हेविश्वात गुरफटलेला असतो. रात्री निवांत असतानाही व्हॉट्सअॅपवरून खून, विनयभंग, बलात्कार, दरोडे आदी मेसेजेसचा मारा होत असतो. दिवसभर गुन्हेविश्वातच काम करावं लागत असल्याने या गोष्टींचं नकारात्मक वातावरण आजूबाजूला तयार होत असतं. त्या वेळी पुस्तकं मला वेगळ्या विश्वात नेतात. मनावरचा ताण, थकवा कमी करतात, मन प्रफुल्लित करतात. सध्या माझ्याकडे नव्याने निर्मिती झालेल्या पालघर जिल्ह्य़ाची जबाबदारी आहे. माझ्याकडे शहरी आणि ग्रामीण भागांतली २३ पोलीस ठाणी आहेत. एवढा मोठा प्रचंड व्याप आहे, पण त्यातूनही वाचनासाठी वेळ काढण्यात आनंद मिळतो. मी प्रवासातही वाचते, त्यातही ट्रेनच्या प्रवासात माझं वाचन खूप चांगलं होतं. माझ्या बॅगेत एक तरी पुस्तक मी बाळगतेच. जसा वेळ मिळाला तशी मी पुस्तकं वाचत असते. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही प्रकारच्या वाचनावर माझा भर असतो. मी आज जी घडलीय ते वाचनामुळेच, यात शंका नाही. विविध ठिकाणांहून मी पुस्तकं विकत घेत असते. दादरचं आयडियल, क्रॉसवर्ड ही माझी पुस्तकं घेण्याची आवडती ठिकाणं. काही प्रकाशक ५० रुपयांत पुस्तके विकत घेण्याच्या योजना आणतात तेव्हा मात्र आवर्जून त्या ठिकाणी जाऊन ४-५ हजार रुपयांची पुस्तकं विकत घेते. काही ठिकाणी किलोवर पुस्तकं मिळतात. तेव्हा तिथे जाऊनही पुस्तकं विकत घेते. या सर्व पुस्तकांचा माझ्या मुंबईच्या घरात अफाट संग्रह तयार झालाय. पुस्तकं माणसांचा सर्वागीण विकास करतात. आपल्या विचारांची प्रक्रिया बदलतात. एखाद्याचं आयुष्य बदलण्याची क्षमता पुस्तकांमध्ये आहे. पुस्तकांमुळे माझी विविधांगी साहित्याशी ओळख झाली. परदेशी साहित्यानेही भुरळ घातली. आता मी विविध भाषांमधल्या मूळ परदेशी साहित्यात शिरायचं ठरवलं आहे. त्यासाठी स्पॅनिश आणि फ्रेंचही शिकणार आहे. लवकरच या परदेशी भाषा आत्मसात केल्यावर या पुस्तकांचा अभ्यास सुरू होईल. पुस्तकांनी जसे व्यक्तिमत्त्व घडवले तशी लिहिण्याचीही प्रेरणा दिली. लवकरच माझंही पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.