वसंत पाटील, नाटय़निर्माते, उद्योजक
माझी भाषा लहानपणापासून सातत्याने केलेल्या वैविध्यपूर्ण वाचनाने समृद्ध झाली, असे भाईंदरमधील आगरी समाजातील आघाडीचे नाटय़निर्माते, उद्योजक वसंत पाटील सांगत आहेत. पाटील यांनी आठ व्यावसायिक आणि ५० हौशी नाटके रंगभूमीवर आणली आहेत.
शाळेत असताना इतिहास हा माझा आवडीचा विषय. इतिहासाच्या पुस्तकातील धडे गोष्टीच्या रूपाने सांगितलेले असल्याने धडेच्या धडे माझे पाठ असत. यातूनच वाचनाची आवड निर्माण झाली. त्यावेळी लहान मुलांच्या गोष्टी, परिकथा आवडीने वाचायचो. मोठे बंधू जयंत पाटील यांना इंग्रजी कादंबऱ्या वाचण्याची आवड होती. मोठा झाल्यावर या कादंबऱ्याही वाचून हातावेगळ्या करू लागलो. पुस्तक एकदा हाती घेतले की ते वाचून पूर्ण होईपर्यंत खाली ठेवायचेच नाही अशी माझी वाचनाची पद्धत. वाचनाचा छंद इतका जडला की घरी आलेल्या पाहुण्यांनी काय खाऊ हवा असे विचारले की गोळ्या चॉकलेट ऐवजी पुस्तकेच द्या असे सांगायचो.
सुरुवातीच्या काळात वाचन हा केवळ करमणुकीचा भाग होता. नंतर मात्र प्रत्येक पुस्तकाच्या वाचनातून काहीतरी शिकायची गोडी लागली. त्याकाळी बाबुराव अर्नाळकर, वि.स.खांडेकर, ना.सी.फडके, बाबा कदम, वि.वा.शिरवाडकर, श्री.ना.पेंडसे असे एक ना अनेक लेखक आवडीचे बनले. नटसम्राट पुस्तकाची तर पारायणे केली. वाचनात आलेला एखादा विशिष्ट शब्द वेगवेगळ्या लेखकांनी आपल्या कथा कादबऱ्यांमधून कसा उपयोगात आणला आहे याचा अभ्यास करण्याची यातून सवय लगली आणि आगरी कुटुंबात वाढलेल्या माझी भाषा समृद्ध होत गेली.
वाचण्यासोबतच नाटकाचे वेड देखील होतेच. त्याचे बाळकडूच मला मिळाले होते. असेच एकदा सुप्रसिद्ध एकांकिका लेखक रमेश पवार यांचे गुरू हे नाटक वाचनात आले. अगदी मनापासून ते भावले. विशेष योग म्हणजे एकांकिकेत काम करण्याची संधीदेखील मिळाली. यातूनच पवार यांच्याशी जवळीक साधता आली आणि रमेश पवार हे नाटय़व्यवसायातील माझे गुरू बनले. गुरु नाटकात समाजातील अगदी निम्न स्तरातील समाजाचे चित्रण पवार यांनी केले आहे. पवार यांच्याप्रमाणेच माझ्या आगरी समाजावर मी लिखाण का करू नये असे सतत माझ्या मनात घोळत होते. पवार यांच्याकडे तसे बोलूनही दाखवले. त्यांनी लगेचच लिहायला सुरुवात कर असा सल्ला दिला. या नाटकाचे तब्बल ५२ प्रवेश मी लिहून पवार यांच्याकडे सुपूर्द केले. पवार यांनी त्यांच्या शैलीतून त्यावर आणखी संस्कार केले आणि त्यातून उभे राहिले ‘वणवा इझेल का’ हे आगरी नाटक. नाटकाचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी पवार यांनी माझ्यावरच सोपवली आणि अशा तऱ्हेने वाचनातून माझ्या नाटय़निर्मितीच्या प्रवासाला सुरुवात झाली. गंगाराम गव्हाणकर, सुरेश जयराम, अजितेम जोशी आदी लेखक आणि थोर अभिनेते यशवंत दत्त यांच्याशी घनिष्ट मैत्री जमली. माझी निर्मिती असलेली ८ व्यावसायिक आणि ५० हौशी नाटके रंगभूमीवर आली. दोनवेळा साहित्यरत्न पुरस्कारदेखील मिळाला. हे सर्व केवळ वाचनामुळेच करू शकलो याचा सार्थ अभिमान आहे.
आजपर्यंत अनेक लेखकांची पुस्तके वाचली असली तरी वि.वा. शिरवाडकरांचे नटसम्राट, ना.सी.फडके यांचे जहर, पु.ल.देशपांडे यांचे व्यक्ती आणि वल्ली, आयार्य अत्रे यांचे कालिंदी ही पुस्तके कायमस्वरूपी मनात घर करून राहिली आहेत. अनुवादित पुस्तकांचेही विपुल वाचन केले आहे. यापैकी अरब देशातील घटनेवर आधारित द अल्केमिस्ट, ज्यू धर्मीयांवरील एक्झोडस ही पुस्तके जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान शिकवून गेली. सध्या आत्मचरित्रांचे वाचन सुरू आहे. जीवनात यशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी आपले ध्येय गाठण्यासाठी कसा संघर्ष केला, त्या कशा घडल्या याचा अभ्यास मी करत आहे.