ठाण्यात सलग दोन आठवडे महोत्सव सुरू आहेत. पहिला महोत्सव भरला होता तो पुस्तकांचा. ‘व्यास क्रिएशन’ या संस्थेने सरस्वती विद्या मंदिराच्या क्रीडा संकुलाच्या सभागृहात ‘वाचू आनंदे’ या महोत्सवाच्या निमित्ताने ठाणेकरांना पुस्तक आणि साहित्यिक कार्यक्रमाची मेजवानी उपलब्ध करून दिली, तर दुसरा महोत्सव सुरू आहे तो आंब्याचा!
तसं पाहिलं तर या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे आंब्याच्या उत्पादनाला प्रचंड फटका बसला, त्यामुळे आंब्याची पेटी अगदी पाच हजार रुपयांपर्यंत विक्रीला आहे, पण खवय्ये तरीही आंब्यावर ताव मारायचे सोडणार नाहीत. वर्षांतून आंबा खायचा म्हणजे खायचा, मग तो कितीही महाग असला तरी चालेल. त्यामुळे स्वाभाविकपणे गावदेवी येथे सुरू असलेल्या आंबा महोत्सवाला गर्दी पाहायला मिळते आहे.
तर ‘व्यास क्रिएशन’ने एक अभिनव उपक्रम लहान मुलांसाठी सुरू केला आहे. त्यांनी एक बाल वाचकांसाठी पुस्तकाची पेटी तयार केली आहे. या पेटीत सुमारे दोनशे पुस्तके असून ही पेटी सोसायटीने विकत घ्यावी आणि वाचनालय सुरू करावे, असा हा उपक्रम आहे. या पेटीची किंमतही पाच हजार रुपये आहे.
विशेष म्हणजे ठाणेकरांचा याही पेटीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. गेल्या महिन्याभरात पुस्तकांच्या शंभर पेटय़ा विकल्या गेल्या. अजूनही मागणी येते आहे, असे आयोजकांचे म्हणणे आहे. ठाणेकरांच्या रसिकतेची आणि पुस्तकप्रेमाची प्रचीती यानिमित्ताने येते आहे. दहा हजार वाचनालये सुरू करण्याचा त्यांचा मानस असून त्या दृष्टीने ते प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे यातून एक चळवळ उभी राहणार आहे. या पुस्तकपेटीतील पुस्तके दर महिन्याला बदलली जातील. नवनवीन पुस्तके त्यामध्ये जमा करून वाचून झालेली पुस्तके बदलत राहण्याची जबाबदारीही त्यांनी घेतली आहे. नाशिकच्या ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ने असा उपक्रम सुरू केला आहे, मात्र तो प्रौढ वाचकांसाठी आहे. ‘व्यास क्रिएशन’चा हा उपक्रम पूर्णपणे बालवाचकांसाठी आहे. आज चांगले बाल वाङ्मय निर्माण होत नाही, ही अनेक मान्यवरांची चिंता आहे. कवी गुलजार यांनीही याबाबत आपल्या भाषणात चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे हा उपक्रम नक्कीच कौतुकास पात्र ठरतो.
या वेळी आयोजित करण्यात आलेल्या पुस्तकांच्या महोत्सवाच्या निमित्ताने ‘व्यास क्रिएशन’ने संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रम राबविले. कवी डॉ. महेश केळुसकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, डॉ. विजया वाड, प्रा. वीणा सानेकर यांच्यासारख्या मान्यवरांनी या महोत्सवात हजेरी लावली. या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांनी केले. त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रमही या वेळी झाला. यानिमित्ताने दहाहून अधिक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
खास वैशिष्टय़ होते ते म्हणजे मुलांसाठी तब्बल दीडशे पुस्तकांचा एक संच तयार करण्यात आला होता, त्यामध्ये अनेक मान्यवर लेखकांनी लेखन केले आहे. ही पुस्तके वाचण्यासाठी मुलांना विनामूल्य उपलब्ध करून दिली होती.
मुलांना आता सुट्टी पडली आहे. काही जणांना खेळायला मैदाने आहेत, पण अनेक मुलांना खेळण्यासाठी जागा नाहीत. संगणक आणि मोबाइलवर खेळण्याचा कंटाळा आला आणि ज्यांचे पालक जागरूक आहेत अशा मुलांसाठी हा महोत्सव म्हणजे एक पर्वणीच होती. काही पालक अगदी न चुकता आपल्या पाल्याला या महोत्सवात आणून पुस्तक वाचायला सांगत होते, वेगवेगळी पुस्तके दाखवत होते, खरेदी करीत होते.  
यानिमित्ताने ठाणे जिल्ह्य़ातील शिक्षकांची एक निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाच्या निमित्ताने सरस्वती शाळेच्या आवारात सुटी असतानाही मुले आणि शिक्षकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. बच्चे कंपनीचा हा महोत्सव ठाण्यात या आठवडय़ात लक्षवेधी ठरला एवढे मात्र नक्की.
 प्राची

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा