भिवंडी येथील भंडारी रोड भागात महापालिकेच्या शाळेच्या कमानीची फरशी अंगावर पडून एका पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. अखेर घटनेच्या दोन आठवड्यानंतर महापालिका कर्मचाऱ्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमानीची देखभाल दुरूस्ती करण्याचे काम महापालिकेचे बीट निरीक्षक महेंद्र जाधव यांच्यावर होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा>>>ठाणे: कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अस्वच्छता
भंडारी रोड येथील भागीरथ कंपाऊंड परिसरात आयुष कुमारशंकर कुशवाह (५) हा राहत होता. याच परिसरात महापालिकेची शाळा क्रमांक ७० ही शाळा आहे. ३ डिसेंबरला सायंकाळी परिसरातील महापालिकेच्या शाळेच्या कमानी खाली आयुष हा खेळत होता. त्याचवेळी कमानीची फरशी त्याच्या अंगावर पडली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.पोलिसांकडून याप्रकरणाची चौकशी करण्यात आली त्यावेळी कमानीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी हा महापालिकेचे बीट निरीक्षक महेंद्र जाधव यांची असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.