महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या टिक टॉकचा बोलबाला आहे. टिक टॉकचा व्हिडियो बनवणारा एक तरी व्यक्ती प्रत्येक घरात असून त्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. फेसबुक, व्हाट्सअॅप आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया अॅपनंतर आता सर्वांना टिक टॉकचे वेड लागले आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच याचे वेड लागले आहे. कोणतीही गोष्ट प्रमाणात करणे योग्य मात्र त्याचा अतिरेक झाला की धोका उद्भवण्याची शक्यता असते. असंच काहीसं झालं मुरबाडमधील एका तरुणाबरोबर. बाईकवर स्टंटबाजी करत टिक टॉक व्हिडिओ शूट करण्याच्या नादात गाडी अंगावर पडून हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

मुरबाड-बारवी धरण रस्त्यावर दोन दिवसापूर्वी एका तरुणाचा गंभीर अपघात झाला. या अपघातामागे टिक टॉक व्हिडिओ शूट करण्यासाठी केलेली स्टंटबाजी कारणीभूत असल्याचे आता समोर आलेल्या व्हिडिओमधून स्पष्ट झाले आहे. काही मित्र टिक टॉक व्हिडिओ शूट करण्यासाठी मुरबाड बारवी धरण रस्त्यावर गेले असताना हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. व्हिडिओसाठी बाईकवर विली मारण्याच्या नादात या तरुणाचा तोल गेला आणि बाईकचे मागचे चाक उचलले गेले. त्यानंतर या तरुणाने ब्रेक दाबला. तरुण तोंडावर पडला आणि गाडी त्याच्यावर पडली. डांबरी रस्त्यावर थेट तोंडावर पडल्याने या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा संपूर्ण व्हिडिओ या तरुणाच्या मित्रांनी त्यांच्या मोबाइल फोनमध्ये रेकॉर्ड केला आहे.

हा अपघात झाल्यानंतर या तरुणाच्या मित्रांनी त्याला मुरबाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घरी हा प्रकार कळू नये म्हणून इतर मुलांनी या अपघातासंदर्भात काही काहीच माहिती दिली नसल्याची माहितीही पुढे येत आहे. मात्र आता हा व्हिडिओ समोर आल्याने या अपघातासाठी टिक टॉक व्हिडिओ शूट करण्यासाठी केलेली स्टंटबाजीच कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे.