लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : आपल्या मनाविरुध्द, आपणास पसंत नसलेल्या तरूणावर प्रेम का करतेस. त्याच्या बरोबर का फिरतेस, असे प्रश्न करून दोन जणांनी डोंबिवली जवळील कोळेगावातील एका घरातून प्रियकर-प्रेयसीला जबरदस्तीने रिक्षेत बसविले. तरूणीला नवी मुंबईत नेऊन तिला लोखंडी सळईने बेदम मारहाण करून तिच्या हात, पायांना गंभीर दुखापती करण्यात आल्या आहेत. तर प्रियकराला बेदम मारहाण करत त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
शुक्रवारी हा प्रकार डोंबिवली जवळील कोळेगाव हद्दीत सचिन रसाळ यांच्या चाळीत घडला आहे. पूजा बबलू राठोड (२१, रा. ग्रीनपार्क झोपडपट्टी, वाशी, नवी मुंबई) असे गंभीर जखमी तरूणीचे नाव आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिचा प्रियकर उमेश यालाही दोन जणांनी बेदम मारहाण करून त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
आणखी वाचा-डोंबिवलीतील कांचनगावमध्ये बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यांना कर्जदारांकडून मारहाण
बबलू राठोड मंडल आणि ५० वर्षाचा त्याचा एक साथीदार अशी आरोपींची नावे आहे. बबलू मंडल हा नवी मुंबईतील ग्रीनपार्क झोपडपट्टीत राहतो. पोलिसांनी सांगितले, जखमी मुलगी पूजा राठोड आणि तिचा मित्र उमेश यांचे प्रेमसंबंध आहेत. त्यांनी विवाह करण्याचे निश्चित केले आहे. विवाहापूर्वीच पूजा आणि उमेश हे कोळेगावातील सचिन रसाळ यांच्या चाळीत राहत होते. याची माहिती मिळताच बबलू मंडल हा आपल्या एका सहकाऱ्यासह नवी मुंबईतून कोळेगावात आला. त्याने पुजाला घराबाहेर बोलविले आणि तू उमेश बरोबर प्रेमसंबंध का ठेवतेस, असे प्रश्न केले. यावेळी दोन्ही आरोपींनी पूजासह उमेश याला बेदम मारहाण केली.
दोन्ही आरोपींनी पूजा आणि उमेश यांना मारहाण करत जबरदस्तीने रिक्षेत बसण्यास सांगितले. ते बसत नव्हते. पण त्यांना रिक्षेत बसले नाहीत तर जीवे ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली. दोघेही रिक्षेत बसल्यावर रिक्षा शिळफाटा भागात आल्यावर बबलू मंडलने प्रियकर उमेश याला जबरदस्तीने रिक्षेतून उतरवून तेथेच सोडून दिले. उमेश हा मुंबईतील गोवंडी भागात राहणार आहे.
आणखी वाचा-मनसेची डोंबिवली, बदलापूरमधील दहीहंडी रद्द, आमदार प्रमोद पाटील यांची माहिती
बबलू मंडलने पूजा राठोला स्वताच्या ग्रीनपार्क झोपडपट्टी येथील घरी नेले. तेथे तिला घरात हाताने, लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पूजाच्या हात आणि पायांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. बबलूने उमेशला यालाही जिवंत सोडणार नसल्याची धमकी पूजाला दिली आहे. या प्रकाराबद्दल पूजाने डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात येऊन बबलू मंडल आणि त्याच्या साथीदारा विरुध्द तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ, कलगोंडा पाटील याप्रकरणाचा तपास करत आहेत.