कल्याण: येथील पूर्व भागातील विजयनगर आमराई भागात शुक्रवारी सकाळी एका तरुणाने प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन धारदार शस्त्राने तिची हत्या केली. हे दोघेही एकत्रित राहत होते. त्याच घरातच त्याने ही हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
रसिका कोलंबेकर (३६) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी विजय जाधव (४८) याला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले, विजय आणि रसिका मागील काही महिन्यांपासून विजय आमराई भागातील एका सोसायटीत एकत्र राहत होते. काही दिवसांपासून विजय हा रसिकाच्या चारित्र्यावर सारखा संशय घेत होता. असे काहीच नसल्याचे ती त्याला सांगत होती. त्यावर विजयचा विश्वास नव्हता.
हेही वाचा… आरोग्य केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यरात्री भेटी; सर्व सुविधा सज्ज ठेवण्याचे सक्तीचे आदेश
यावरून रसिका आणि विजय यांच्यात दररोज वाद होत होते. शुक्रवारी सकाळी त्यांच्यात नेहमीप्रमाणे वाद झाला. यावेळी संतापलेल्या विजयने घरातील धारदार शस्त्राने रसिकावर वार केले. तिला गंभीर जखमी केले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी ही माहिती कोळसेवाडी पोलिसांना दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी येऊन विजयला ताब्यात घेतले. रसिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.