ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून ठाकरे गटाचे उमदेवार राजन विचारे यांनी निष्ठावान विरुद्ध गद्दार असा प्रचार सुरू केला आहे. त्यापाठोपाठ आता ‘ब्रँड ठाकरे, एकटा लढतो विचारे….उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली…’ असे रॅप गाणे तयार केले असून त्यामाध्यमातून ठाकरे गटाने शिंदे गटावर एकप्रकारे अप्रत्यक्षपणे निशाणा साधत ब्रँड ठाकरे असल्याचा उल्लेख केला आहे.
देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडी विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना सर्वत्र रंगला आहे. परंतु शिवसेनेच्या उठावाचे केंद्रबिंदू असलेल्या ठाणे जिल्ह्यात मात्र ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगणार आहे. ठाकरे गटाने खासदार राजन विचारे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देऊ केली आहे. तर, शिंदेच्या सेनेकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. महायुतीत ही जागा शिवसेनेला मिळणार की भाजपला याविषयी संभ्रम आहे. असे असले तरी या मतदारसंघाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नसला तरी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनीही प्रचाराला सुरुवात केली असून त्यात ते निष्ठावान विरुद्ध गद्दार असा प्रचार करीत आहेत. त्यापाठोपाठ आता ‘ ब्रँड ठाकरे, एकटा लढतो विचारे….उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली…’ असे रॅप गाणे तयार केले असून त्यामाध्यमातून ठाकरे गटाने शिंदे गटावर एकप्रकारे अप्रत्यक्षपणे निशाणा साधत ब्रँड ठाकरे असल्याचा उल्लेख केला आहे.
काय म्हटले आहे रॅप गाण्यात
क्रांतीची ही मशाल धगधगते या उरी, देश माझा महाराष्ट्र, धर्म माझा मातोश्री. ही भगवी माझी निष्ठा, हा भगवा माझा प्राण रे… भगवे माझे रक्त, भगवा माझा श्वास रे… मेलो या जगात तरी भगवी माझी राख रे…आसमंतात साहेबांची गर्जना झाली, निष्ठेच्या लढाईची वेळ आता आली, असे रॅप गाण्यात म्हटले आहे. बोलतो विचारे रोखठोक बात रे… सांगून गेला बाप माझा सोडू नका साथ रे… गद्दार सारे पळवा पण माफ नका करू रे… मशीनमध्ये ईडीच्या घाण झाली साफ रे…कॉलर आपली टाइट कारण ब्रँड आपला ठाकरे. एकनिष्ठ, पक्षनिष्ठा आम्ही सैनिक. ठाण्याचा वाघ दिघेंचा मी सैनिक. सामान्य जनतेपासून सत्य तुम्ही लपवले, शाखेत तुम्ही षंढ गुंड घुसवले, वाटेत माझ्या ते लाल निखारे वाघाचा बछडा एकटा लढतो विचारे, असे गाण्यात म्हटले आहे.