डोंबिवली- वसई-पनवेल रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या मराठी नावांमध्ये आणि उद्घोषकांमधून स्थानकांच्या नावाची उद्घोषणा करताना मोडतोड होत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक प्रवाशांनी याविषयी रेल्वे प्रशासनाला कळविले आहे. त्याची दखल घेतली जात नाही, असे प्रवाशांनी सांगितले.वसई-पनवेल रेल्वे मार्गावर नव्याने विद्युत स्थानक दर्शक फलक बसविण्यात आले आहेत. यामध्ये स्थानकाचे नाव, वेळ दाखविली जाते. स्थानकाचे नाव परिसरातील गावाप्रमाणे स्थानकाला देण्यात आले आहे. या गावांची मूळ नावे बदलून (व्याकरणातील काना वगळून) दर्शक फलकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचा स्थानकाचे नाव ऐकून गोंधळ उडत आहे.
हेही वाचा >>>डोंबिवलीत उद्धव ठाकरे समर्थकांचे नववर्षाचे शुभेच्छा देणारे फलक फाडले
कोपर-वसई रेल्वे मार्गावर कामण, खारबाव ही रेल्वे स्थानके आहेत. रेल्वे स्थानकांवरील विद्युत दर्शक फलकांमध्ये कामण स्थानकाचा उल्लेख ‘कमण’, खारबाव रेल्वे स्थानकाचा उल्लेख”खरबाव” असा करण्यात येतो. इतर स्थानकांच्या काना, वेलांटीला कात्री लावण्यात आली आहे. तसेच उद्घोषकाकडून स्थानकाचा उल्लेख चुकीच्या पध्दतीने करण्यात येत असल्याने शटल, लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमधील प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. वसई, दिवा, कोपर, पनवेल भागातील अनेक भाजीपाला विक्रेता, मासळी विक्रेत्या महिला पनवेल-वसई, दिवा-वसई शटलने प्रवास करतात. स्थानकावरील चुकीच्या नावाच्या उल्लेखामुळे अनेक महिला प्रवाशांना योग्य माहिती मिळत नसल्याने त्यांना पुढील रेल्वे स्थानकात जाऊन उतरावे लागते, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या.
हेही वाचा >>>मुंब्र्यात दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, पिण्यायोग्य पाणी देण्याची काँग्रेसची मागणी
वसई-पनवेल रेल्वे मार्गावर शटल गाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे या गाड्यांना प्रवाशांची तुडुंब गर्दी असते. शटलचे दरवाजाने निमुळते असतात. त्यामुळे प्रवाशांना चढ उतर करताना कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत पुढील स्थानक कोणते याची माहिती शटलमधील उद्घोषकाकडून योग्यरितीने मिळाली नाही तर प्रवाशांचा गोंधळ उ़डतो. अनेक वेळा नोकरदार प्रवाशांची हीच अवस्था होते. त्यांना पुढील स्थानकात जाऊन पुन्हा रिक्षा, मिळेल त्या वाहनाने आपल्या इच्छित स्थळी जावे यावे लागते, असे अनुभव प्रवाशांनी सांगितले.
मध्य रेल्वेकडे मराठीचा अभ्यास असणारे कोणी जाणकार अधिकारी आहेत की नाही. फलाटांवर दर्शक बसविताना त्या स्थानकांची नावे योग्यरितीने लिहिली आहेत की नाही याची खात्री अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे होते. किंवा मराठीची कितीही वाट लावली तरी आम्हाला कोणी जाब विचारणार नाही, असा आत्मविश्वास रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे का, असे प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.अधिक माहितीसाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्याने याप्रकरणाची माहिती घेऊन बोलतो असे उत्तर दिले.