एक लाखाहून अधिक ग्रंथ आणि एक हजाराहून अधिक ‘ई-बुक्स’च्या माध्यमातून साडेसात हजाराहून अधिक विद्यार्थी-शिक्षकांची वाचनाची भूक भागवणाऱ्या ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या गं्रथालयाने दृष्टिहीनांसाठीही वाचनाचे दालन खुले केले आहे. ठाणे शहरातील सर्वात जुने महाविद्यालय अशी ओळख असलेल्या या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ‘ब्रेल’ विभाग सुरू करण्यात आला असून कोणत्याही दृष्टिहीन व्यक्तीला येथे नोंदणी करून वाचनाचा आनंद उपभोगता येणार आहे.
जिल्ह्यातील या पहिल्यावहिल्या ‘ब्रेल’ गं्रथालयाचे उद्घाटन विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी दृष्टिहीन वाचकांसाठी ‘स्पर्शज्ञान’ नियतकालिक चालवणारे संपादक स्वागत थोरात उपस्थित होते. विद्या प्रसारक मंडळाच्या विविध महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांना ग्रंथवाचनासाठी महाविद्यालयाच्या वतीने वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यात येत आहेत. त्यामध्ये दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाचणारे वाचकही पुरवले जातात. त्यासाठी महाविद्यालयाने विशेष कक्षही उभारला आहे. याशिवाय ‘स्क्रीन रीडर’ प्रोग्रॅमच्या माध्यमातून संगणकावरही दृष्टिहीन विद्यार्थ्यांना पुस्तकवाचनाचा आनंद घेता येत होता. मात्र, या दोन्ही प्रणालींमध्ये मर्यादा होत्या. शिवाय ‘ब्रेल’ पुस्तकांचा आकार मोठा असल्याने महाविद्यालयात स्वत:ची पुस्तके घेऊन येणाऱ्या अंध विद्यार्थ्यांना मोठे गाठोडे घेऊन यावे लागत होते.
या पाश्र्वभूमीवर, ग्रंथालयातच ब्रेल विभाग सुरू करण्याचा निर्णय महाविद्यालयाने घेतला. पुण्यातील रश्मी पांढरे यांच्या सावित्री फोरम या संस्थेने ‘ब्रेल’ ग्रंथांची देणगी देऊन उपक्रमाला पाठिंबा दिला. महाविद्यालयानेही आर्थिक तरतूद करून ग्रंथ खरेदी केली. त्यातून दोनशेहून अधिक पुस्तकांचा संग्रह ग्रंथालयात जमा झाला. बुधवारी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात डॉ. विजय बेडेकर, स्वागत थोरात, ब्रेल पुस्तकाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे उमेश चेहरे, रश्मी पांढरे आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या शकुंतला सिंग उपस्थित होते.  
मधु मंगेश कर्णिक, आनंद नाडकर्णी, रत्नाकर मतकरी, माधवी देसाई, सुधीर मोघे, पु.ल.देशपांडे अशा नामवंत साहित्यिकांची ग्रंथसंपदा या विभागात उपलब्ध आहे. या विभागातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच शहरातील अन्य दृष्टिहीन विद्यार्थी आणि वाचक या ग्रंथालयाचा लाभ घेऊ शकणार आहेत.
-नारायण बारसे, ग्रंथालय विभाग प्रमुख

अंध व्यक्तींना वाचण्याचा आनंद घेण्यासाठी ब्रेलशिवाय पर्याय नाही. दुसऱ्यांकडून वाचून किंवा संगणकाच्या साहाय्याने ऐकून पुस्तक समजणे आणि प्रत्यक्ष स्वत: हा वाचण्याचा आनंद घ्यायचा असेल तर ब्रेल पुस्तकांशिवाय पर्याय नाही. त्यासाठी ब्रेल ग्रंथालयांची निर्मिती होण्याची गरज आहे.
-स्वागत थोरात, ‘स्पर्शज्ञान’चे संपादक