कामावर अवलंबून असलेल्या मजुरांच्या रोजगारावरही परिणाम

कल्पेश भोईर, वसई

अकाळी पावसाचा वसईतील शेतकऱ्यांबरोबर वीटभट्टी व्यावसायिकांनाही मोठा आर्थिक फटका बसला आह. दरवर्षी ऑक्टोबरनंतर पालघर जिल्ह्य़ासह वसईच्या ग्रामीण भागात वीटभट्टी व्यवसायाला सुरुवात होत असते, मात्र यंदाच्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसाने इतर व्यवसायांबरोबरच वीटभट्टी व्यवसाय लांबणीवर पडला असून त्याचा परिणाम वीटभट्टी व्यावसायिक व ग्रामीण भागातून येणाऱ्या मजुरांवर झाला आहे.

यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक काळ परतीचा पाऊस लांबल्याने या पावसाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. यामध्ये शेती, मच्छीमार, फळभाज्या, बागायतदार, मीठ उत्पादक यासह पारंपरिक व्यवसाय म्हणून ओळख असलेल्या वीटभट्टी या व्यवसायाला फटका  बसला आहे. पालघर जिल्ह्य़ातील पारोळ, शिरवली, उसगाव, मेढे, आंबोडे, घाटेघर, सायवन, भिनार, देपीवली, माजिवली, म्हस्कीने, तिल्हेर, भाताणे, नवसई, शिवणसई, कामण यासह वसईच्या विविध ठिकाणच्या ग्रामीण भागात वीटभट्टी हा व्यवसाय केला जात आहे.

सुरुवातीला हा व्यवसाय अधिक तेजीमध्ये सुरू होता. मात्र, सध्या हा व्यवसाय अडचणीत येऊ  लागला आहे. रेतीउपसा आणि वाहतुकीवर असलेल्या कायदेशीर र्निबधामुळे या व्यवसायाशी संबंधित वीट व्यवसायावर कमालीचा फरक पडला आहे. वीटमाल विकत घेणाऱ्यांकडूनच देणी मिळत नसल्याने वीटमजुरांना द्यायला पैसे नसतात. वीट व्यवसायिक प्रचंड कोंडीत सापडला आहे. उत्पादित केलेला माल विकला जाण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागते. त्यातच या अशा निर्माण होणाऱ्या नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे वीट व्यावसायिक उदय घरत यांनी सांगितले आहे

दरवर्षी दसरा- दिवाळी सण संपल्यावर या व्यवसायाची सुरुवात केली जाते. तेव्हापासून मनुष्यबळ जमविणे, जागा, स्वच्छता, खड्डे मारणे, मातीची जमवाजमव, मातीमळणी यासह विविध प्रकारच्या प्रक्रिया करण्याच्या कामाला सुरुवात होत असते; परंतु या वर्षी हवामानात झालेल्या बदलामुळे पाऊस लांबणीवर पडला आहे. त्यामुळे त्यासाठी लागणारी जागा ही ओली राहिली असल्याने वीटभट्टी सुरू करण्यासाठी विलंब झाला आहे तसेच काम वेळेत सुरू न होऊ शकल्याने याचा परिणाम वीटभट्टीच्या उत्पादनावर होणार आहे, असे वीटभट्टी व्यावसायिकांनी सांगितले आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक मजूर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या वीटभट्टीवर कामाला जात असतात आणि यावरच लाखो बांधवांचा उदरनिर्वाह हा या वीटभट्टीवरील कामावर चालतो.

यंदाच्या वर्षी पाऊस लांबणीवर पडल्याने वीटभट्टय़ा सुरु करण्यासाठी उशीर झाला आहे. त्यामुळे या वर्षी वीटमाल कमी तयार झाला आहे.

– मनोहर म्हात्रे, वीटभट्टी व्यावसायिक

आधीच वीट व्यवसाय नुकसानाच्या झळा सोसत असताना यंदा परतीच्या पावसाचा या व्यवसायावर परिणाम होत आहे. मजूरही मिळेणासे झाले आहेत.

– कल्पेश पाटील, वीट व्यावसायिक

Story img Loader