मुदत टळूनही ठेकेदाराला वाढीव खर्चाची खिरापत; ठाणे पालिकेच्या तिजोरीवर ४ कोटींचा भार

संथगती कामांमुळे वारंवार मुदत टळूनही ठाण्यातील तीन उड्डाणपुलांचे कंत्राट दिलेल्या ठेकेदाराला वाढीव खर्चाची खिरापत वाटण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडीत भर पाडणाऱ्या या पुलांची कामे आधीच वादात सापडली असताना या कामांसाठी चार कोटी ३७ लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. त्यामुळे आता या पुलांच्या खर्चावरून नवीन वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील बहुतांश रस्ते अरुंद असून या रस्त्यांवर गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी होते. या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. मीनाताई ठाकरे चौक, तीन पेट्रोल पंप आणि नौपाडा या तीन ठिकाणी उड्डाणपुलांसाठी २२३ कोटी ६९ लाख ६१ हजार रुपये इतका निधी खर्च करण्यात येत आहे. एमएमआरडीएच्या निधीतून हा खर्च करण्यात येत असून या कामाचे तांत्रिक पर्यवेक्षण महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. तीन पेट्रोल पंप भागातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर मीनाताई ठाकरे चौक आणि नौपाडा या पुलांची कामे अजूनही सुरू आहेत. ठरविलेल्या मुदतीत या तिन्ही पुलांची कामे पूर्ण झालेली नसून या पुलांच्या कामाच्या खर्चात वाढ झाली आहे. उड्डाणपूल प्रकल्प खर्चाव्यतिरिक्त भविष्यात वाढणारा खर्च महापालिकेने करावा, अशी अट एमएमआरडीएने घातली होती. या अटीमुळे वाढीव खर्चाची रक्कम ठेकेदाराला देण्यासाठी महापालिका प्रशासनाने त्यासंबंधीचा प्रस्ताव शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे.

खर्चात वाढ कशी?

* अल्मेडा रस्त्यावरील एकेरी वाहतूक विचारात घेऊन पुलाची रुंदी ७.७५ मीटर इतकी निविदाप्रमाणे करण्यात आली होती. मात्र या पुलावर दुहेरी वाहतूक करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून झाल्यामुळे त्याची रुंदी ८.५० मीटर इतकी करण्यात आली. त्यामुळे पुलाच्या कामात ३ कोटी ६३ लाख ४५ हजार ०५२ रुपयांच्या खर्चाची वाढ झाली आहे. पूल बांधकामामध्ये बचत होणार असल्यामुळे प्रत्यक्षात १ कोटी ९९ लाख ३७ हजार रुपये इतका वाढीव खर्च येणार आहे.

*  पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम करताना मलवाहिनी, जलवाहिनी, विद्युतवाहिनी या स्थलांतरित कराव्या लागल्या असून त्यासाठी १ कोटी ३ लाख रुपये इतका वाढीव खर्च आला आहे.

*  इतर कामांसाठी २५ लाख रुपये खर्च आला आहे. एकूणच या पुलांच्या कामाच्या खर्चात ३ कोटी २७ लाख रुपये इतकी वाढ झाली आहे, असे पालिकेने प्रस्तावात म्हटले आहे.

*  या पुलाच्या कामासाठी नेमलेल्या तांत्रिक सल्लागाराची मुदत वाढवावी लागणार असून त्यासाठी एक कोटी १० लाख रुपये खर्च वाढला आहे, असेही पालिकेने प्रस्तावात म्हटले आहे.