रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील कोथळीगडावर एक ब्रिटीश बनावटीची तोफ सापडली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या प्रयत्नांमुळे सापडलेल्या या तोफेला बाहेर काढून तिला प्रवेशद्वार पासून जवळ असलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले.

सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाचे अध्यक्ष सुधीर साळोखे आणि सदस्य गणेश बोराडे हे आठवडाभरापूर्वी किल्ल्याच्या नियमित पाहणीसाठी कोथळीगडावर गेले होते. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना, पूर्वजांनी दिलेल्या माहितीनुसार गडावरील दोन तोफांव्यतिरीक्त आणखी एक तोफ होती अशी माहिती दिली. मात्र ही तोफ नक्की कुठे होती याबद्दलची माहिती गावकऱ्यांना सांगता आली नाही. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संस्थेच्या सदस्यांनी किल्ल्याच्या परिसरामध्ये तोफेचा शोध घेतला. या शोधमोहिमेमध्ये गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या १०० फूट खोल अंतरावर एका भल्या मोठ्या दगडाखाली मातीत बुजलेली ४.५ फुट लांबीची तोफ सापडली. ७ एप्रिल रोजी सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या तोफेला सुरक्षित ठिकाणी हालवण्यासाठी एका मोहिमेचे नियोजन करण्यात आले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या तोफेला मातीतून बाहेर काढून दोरखंडाच्या साह्याने १०० फूट वर असलेल्या प्रवेशद्वारापासून जवळ असलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवले. जवळपास ५ तास चाललेल्या या मोहिमेमध्ये संस्थेच्या ६० सदस्यांनी भर उन्हात श्रमदान करून या तोफेला नवसंजीवनी दिली. आजवर कोथळी गडावर दोन तोफा होत्या परंतू गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तोफेचा शोध घेऊन इतिहासापासून लुप्त झालेल्या तोफेला बाहेर काढण्यात यश आल्याने गडाला भेट देणाऱ्यांना ही तोफ पाहता येणार आहे. गावकऱ्यांनी या मोहिमेमध्ये दिलेल्या सहकार्याबद्दल श्रमिक गोजमगुंडे यांनी गावकऱ्यांचे आभार मानले. तसेच पुरातत्व विभागाने केलेल्या सहकार्य बद्दल हि आभार व्यक्त केले. या किल्याची दुर्ग अवशेषात नोंद व्हावी म्हणून पुरातत्व विभागाला पत्राद्वारे तोफेचे मोजमाप आणि माहिती दिली जाणार आहे. लवकरच या तोफेला तिचे पुर्नवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागामार्फत तोफगाडा बसविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे दुर्ग संवर्धन विभाग अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी दिली.

कर्जतपासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेल्या कोथळीगड उर्फ पेठ किल्ला या गडावर आजवरच्या इतिहास अभ्यासक संशोधकांनी केलेल्या लिखाणामध्ये गडाच्या इतिहासात दोन तोफांची नोंद होती. त्यातील एक उखळी तोफ ही गडाच्या माचीवरील पेठ या गावात आहे, तर गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ दुसरी तोफ आहे. प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर ६.५ फूट लांबीची तोफ दिसते. बऱ्याच इतिहास अभ्यासकांनी गडावर तिसरी तोफ नाही असे सांगितले होते. मात्र गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तिसरी तोफ गडाच्या परिसरात असल्याचे सांगितले जायचे. गडावर असलेल्या ६.५ लांबीच्या तोफेला फेब्रुवारी २०१९ रोजी सह्याद्री प्रतिष्ठानने या तोफेला लोकवर्गणीतून तोफगाडा बसविला आहे. गडाच्या इतिहासाच्या आधारे या गडाचा मराठी इंग्रजी कागदपत्रातून तसेच मुघली कागद पत्रातून एक बलाढ्य संरक्षण ठाणे म्हणून ओळख होती असे दिसून येते. मराठ्यांचे या गडावर शस्त्रागार होते. संभाजी महाराजांच्या काळात या गडाला विशेष महत्व आले होते.

तोफ

सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था गेल्या १० वर्षापासून गडकिल्ले संवर्धन यासाठी महाराष्ट्रभर कार्य करत असून आतापर्यंत संस्थेने महाराष्ट्रातील विविध किल्यांवर ७०० हून अधिक स्वच्छता मोहिमा राबवल्या आहेत. या मोहिमा केंद्रीय पुरातत्व विभाग व राज्य पुरातत्व विभागाच्या संरक्षित किल्यांवर सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने राबविल्या जातात. संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्ग संवर्धनाची चळवळ महाराष्ट्राबर सुरु असून हजारो दुर्गप्रेमी संस्थेमार्फत विविध गडकिल्ल्यांवर दुर्ग संवर्धन मोहिमा राबवतात.

Story img Loader