अंबरनाथः अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्यमार्गावर बहुतांश भागात दुभाजक आहेत. मात्र अनेक ठिकाणी हे दुभाजक तुटलेल्या अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी दुभाजकाचे सिमेंटचे ठोकळे रस्त्यात पडले आहेत. त्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळते आहे. अनेकदा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना या अचानक येणाऱ्या या दुभाजकांच्या तुकड्यांमुळे वाहने वळवावी लागतात. त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होते आहे. या दुभाजकाच्या देखभाल दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होताना दिसते आहे.
अंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण बदलापूर राज्यमार्ग हा सर्वाधिक वर्दळीचा असा मार्ग आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या रस्त्याची उभारणी सुरू झाली. मात्र निर्मितीपासून ते आजतागायत हा मार्ग अनेक समस्यांमुळे वादात सापडला. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सध्या अनेक वाणिज्य आस्थापना, गृहसंकुले उभी राहत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली आहे. उल्हासनगरच्या प्रवेशद्वारापासून मटका चौकापर्यंत या रस्त्यावर दुभाजक आहेत. तर पुढे महात्मा गांधी शाळेपासून ते फॉरेस्ट नाका आणि पुढे या मार्गावर दुभाजक आहेत. मात्र या टप्प्यातल्या दुभाजकांची दुरावस्था वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरू लागले आहेत. या दुभाजकाचे अनेक सिमेंटचे ठोकळे गळून पडले आहेत. त्यातील काही ठोकळे तुटल्याने रस्त्यात आले आहेत. अनेक ठिकाणी वाहनांनी वळण घेताना दुभाजकाला धक्का लागलेला आहे. त्यात दुभाजकाचे हे ठोकळे हलले आहेत. त्यामुळे रस्त्यात अडथळा येतो आहे. काही ठिकाणी दुभाजकाचे ठोकळे कधीही रस्त्यावर पडू शकतात अशा अवस्थेत आहेत. त्या ठोकळ्यांना हटवण्याची गरज आहे. मात्र त्याकडे रस्त्याची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कानाडोळा जात असल्याचा आरोप वाहनचालक करत आहेत.
फॉरेस्ट नाका भागातच बदलापूरहून अंबरनाथकडे येणाऱ्या मार्गावर सिग्नल सुटल्यानंतर चौकातच दुभाजकाचे तुकडे पडले आहेत. त्यामुळे येथे अचानक वाहने वळवावी लागतात. परिणामी मागे वाहतूक कोंडी होते. रस्त्याच्या कडेला अचानक येणाऱ्या या दुभाजकांच्या तुकड्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होते. वाहन चालवताना अचानक मध्ये दिसणाऱ्या या दुभाजकांमध्ये अचानक वाहने धीम्या गतीने चालवावी लागतात. त्यामुळे या दुभाजकांची वेळीच दुरूस्ती करण्याची गरज व्यक्त होते आहे.