ठाणे : मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी चार्जर घेतला म्हणून ३८ वर्षीय व्यक्तीने त्याच्या थोरल्या भावावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वागळे इस्टेट येथे ३८ वर्षीय तरूण हा त्याचे आई-वडील आणि थोरल्या भावासोबत राहतो. शनिवारी त्याचा भाऊ चार्जर घेऊन मोबाईल चार्जिंग करत होता. याचा राग आल्याने दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर तरूण घरातून बाहेर पडला. तो पुन्हा घरी आला असता त्याच्या हातामध्ये चाकू होता. त्याने भावाच्या पोटाजवळ चाकूने दोन वार केले. सुदैवाने आई-वडिलांनी अडविल्याने जखमी तरूणाचा जीव वाचला आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.