लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उल्हासनगर: पहिल्यांदाच आलेल्या मासिक पाळीबाबत असलेल्या अज्ञानातून आपल्याच बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत एका भावाने तीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर शहरात समोर आला आहे. सलग काही दिवस केलेल्या मारहाणीत १२ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यवर्ती रुग्णालयात रविवारी दुपारच्या सुमारास एका १२ वर्षीय मुलीला उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्याच कुटुंबीयांनी या मुलीला रुग्णालयात आणले होते. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मुलीला तपासून मृत घोषित केले. मात्र मुलीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने डॉक्टरांनी मध्यवर्ती पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांनी चौकशी केली असता भावाने त्या मुलीला उपचारासाठी आणल्याचे समोर आले. मुळची उत्तर प्रदेशातील असलेली ही मुलगी कॅम्प तीन भागात आपल्या भाऊ आणि वहिनीसोबत राहत होती.

हेही वाचा… धक्कादायक! डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, २२ वर्षीय आरोपीला पोलिसांनी केली अटक

पोलिसांच्या तपासात आपणच बहिणीला मारहाण केल्याचे या भावाने कबूल केले. याबाबत त्याला कारण विचारले असता बहिणीला अचानक झालेल्या रक्तस्त्रावावरून संशय आल्याने आपण बहिणीला मारहाण केल्याचे या भावाने सांगितले. हा नराधम बहिणीला अनैतिक संबंधाबाबत सातत्याने विचारत मारहाण करत होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र त्या मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी सुरू झाली होती.

हेही वाचा… भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना ॲट्रोसिटी प्रकरणात जामीन

मात्र तरीही सलग चार दिवस या नराधम भावाने त्याच्या अल्पवयीन बहिणीला लोखंडी सळई आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यात आधीच आलेला अशक्तपणा आणि उपाशी असल्याने मुलीची तब्येत खालावली. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. म्हणून या भावाने तिला रुग्णालयात उपचारासठी आणले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. मात्र तोपर्यंत या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. भावाच्या या क्रूर कृत्यामुळे त्याच्याविरुद्ध संताप व्यक्त केला जातो आहे. तर मुलीच्या या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.