डोंबिवली – डोंबिवली जवळील ९० फुटी रस्त्यावरील कचोरे येथे गुरुवारी रात्री साडेदहा वाजता दुचाकीवरून चाललेल्या एका व्यक्तीच्या अंगावर फटाके फोडणाऱ्या स्थानिकांनी पेटता सुतळी बाॅम्ब फेकला. मोठ्या आवाजात फुटलेल्या सुतळी बाॅम्बमुळे दुचाकीस्वाराची दुचाकी बंद पडली. आपण पादचारी पाहून फटाके फोडा, असे दुचाकीस्वाराने सांगताच फटाके फोडणाऱ्या स्थानिकांनी दुचाकीस्वाराला मारहाण करत त्याच्या भावाला लोखंडी गजाने मारहाण केली.

टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी प्राथमिक तपासणी अहवाल (एफआयआर) दाखल आहे. ओमकार केशव पवार (१८) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते कल्याणमध्ये सिमेंट धक्का येथे हमालाची कामे करतात. ते बंजारानगर कचोरेगाव येथे एकत्रित कुटुंब पद्धतीने राहतात.

हेही वाचा – कारच्या छतावरून फटाक्यांची आतषबाजी, ठाण्यात गंभीर प्रकार, चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिसांनी सांगितले, गुरुवारी रात्री कचोरे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोरून ओमकार पवार जात होते. तेथे मोगीस खान (२४), वसीम पटेल (२४) रस्त्यावर फटाके फोडत होते. मोगीस यांनी पेटता सुतळी बाॅम्ब ओमकार यांच्या अंगावर फेकला. त्याचवेळी ओमकार यांची दुचाकी तेथे बंद पडली. पादचारी पाहून फटाके फोडा असे ओमकार यांनी मोगीस यांना सांगितले. त्याचा राग येऊन मोगीस यांनी तू मोठा पटेल आहेस का. तुझा मंत्री बाप कुठे आहे, असे बोलत ओमकार यांना शिवीगाळ केली. मोगीसच्या नातेवाईकांनी ओमकारला मारहाण केली. त्यावेळी तेथे ओमकारचे भाऊ गणेश पवार आले. त्यांनाही मारहाण करण्यात आली.

मोगीस यांनी लोखंडी गजाने गणेश यांंना मारहाण केली. या दोघांना वाचविण्यासाठी कोणी पुढे आला तर त्यांना संपून टाकीन अशी धमकीची भाषा केली. या दहशतीने परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. दुकाने व्यापाऱ्यांंनी बंद केली. १५ जण तेथे धाऊन आले. त्यामधील इस्माईल खान, आयुब खान, युसुफ खान, युनुस खान यांनी ओमकारला बेदम मारहाण केली.

हेही वाचा – आमची देना बँक आहे, लेना बँक नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याणमध्ये विरोधकांवर टीका

ओमकार पवार यांचे परिचित तेथे आल्याने त्यांनी जमावाच्या ताब्यातून ओमकारची सुटका केली. गणेशवर लोखंडी सळईचा हल्ला झाल्याने त्यांना कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओमकार यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात येऊन याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, मोगीस खान यांनीही ओमकार पवार, गणेश आणि इतरांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवली. हातात दांडके घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. तसेच, आपणासह वसीम पटेल, युसुफ खानसह आपल्या कुटुंबीयांना मारहाण करून दुखापत केल्याची तक्रार टिळकनगर पोलीस ठाण्यात केली आहे.