सोपाऱ्यातील बौद्ध स्तूप परिसरातील गैरसोयी दूर होणार; पुरातत्त्व खात्याची तयारी

नालासोपारा येथील सोपारा गावातील पुरातन आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या बौद्ध स्तूप परिसरातील गैरसोयी दूर करण्याचे आश्वासन पुरातत्त्व खात्याने पालिकेला दिले आहे. बौद्ध स्तुपाची दुरवस्था झाल्याच्या तक्रारी पुरातत्त्व खात्याकडे वारंवार करण्यात आल्या होत्या. त्यानंतर हा निर्णय खात्याने जाहीर केला आहे. यानंतर कामाची पाहणी करण्यासाठी पुरातत्त्व खात्याच्या महासंचालिका स्तुपाला भेट देणार आहेत. पालिकेनेही स्तुपाचा विकास करण्याची तयारी दर्शवली असून पुरातत्त्व खात्याकडे त्यासाठी परवानगी मागितली आहे.

सांची स्तुपाची प्रतिकृती असलेला हा बौद्ध स्तूप अडीच हजार वर्षे जुना आहे. हा स्तूप बौद्ध धम्माच्या जगातील प्रसाराचे एक प्रमुख केंद्र होते. कोकण प्रांताची शूर्पारक (आताचे सोपारा) ही राजधानी होती. चंदनी दरवाजे असलेल्या या बुद्धविहारची स्थापना भगवान गौतम बुद्धांनी केली होती, अशी नोंद आहे. मात्र पुरातत्त्व खात्याच्या उदासीनतेमुळे स्तुपाची दुरवस्था झालेली आहे. या बौद्ध स्तुपाला हजारो पर्यटक, बौद्ध भिक्खू, अनुयायी भेट देत असतात. मात्र तिथे प्राथमिक सोयीसुविधाही नसल्याने त्यांची गैरसोय होत असते. स्तुपाच्या परिसरात बसण्यासाठी बाकेही नाहीत. त्यामुळे इथे येणारे बौद्ध भिक्खू आपल्यासोबत तंबू घेऊन येतात. स्तुपाची दररोज स्वच्छता होणे आवश्यक आहे. स्तुपाच्या मार्गावर महापालिकेने भव्य प्रवेशद्वार बनवले होते. या प्रवेशद्वारावरील मूर्तीही निखळून पडू लागल्या आहेत. महानगरपालिकेने मार्च महिन्यात येथे येणाऱ्या अनुयायांसाठी अडीच लाख रुपये खर्चून जलशुद्धीकरण यंत्रणा बसवली होती. मात्र स्तुपाजवळ कुठलीच सुरक्षा व्यवस्था नसल्याने त्या यंत्राचीही चोरी झालेली आहे. पुरातत्त्व खात्याने फिरते शौचालय देण्याचे आश्वासन दिलेले होते. मात्र त्याची व्यवस्था  अद्याप केलेली नाही. येथे एखादा कार्यक्रम असेल तरच पालिकेकडून फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात येते. मात्र अन्य वेळी येथे येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होत असते.

याबाबतचे वृत्त लोकसत्ताने नुकतेच प्रसिद्ध केले होते. हा स्तूप पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित येत असल्याने पालिकेला काही सुविधा देता येत नाही. त्यामुळे वसई विरार महापालिकेचे महापौर रुपेश जाधव यांनी शुक्रवारी दिल्लीत पुरातत्त्व खात्याच्या महासंचालिका उषा शर्मा यांची भेट घेऊन अडचणी सांगितल्या. स्तुपाच्या दुरवस्थेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलीन होत असल्याचे लक्षात आणून दिले. यावेळी स्तुपाचे संवर्धन करण्यासाठी शर्मा यांनी स्तुपाला भेट देण्याचे आश्वासन दिले आहे. जानेवारी महिन्यात होणाऱ्या धम्म परिषदेलाही त्या उपस्थित राहणार आहेत.

पालिकेकडून विकासाचा प्रस्ताव

बौद्ध स्तुपाचा संपूर्ण विकास करण्याची पालिकेची तयारी आहे. आम्ही पुरातत्त्व खात्याच्या महासंचालिकांबरोबर स्तुपाचा विकास करण्यासंदर्भात चर्चा केली. पालिकेकडे निधीची कमतरता नाही. पुरातत्त्व खात्याने आम्हाला ना हरकत दाखला द्यावा. आम्ही स्तूप परिसराचा विकास करू, असे महापौर रुपेश जाधव यांनी सांगितले. यावेळी माजी महापौर नारायण मानकर उपस्थित होते.

Story img Loader