ठाणे : मुंबई महानगर प्रदेश आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र अर्थात ग्रोथ हब म्हणून विकसीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच अनुषंगाने नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई आणि खारघर या दोन ठिकाणी विकास केंद्रांची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सोबतच नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार स्थापन केला जाणार आहे. रोजगार वाढीसह येथील विकासाला यामुळे चालना मिळणार आहे.

निती आयोगाच्या शिफारशीनुसार मुंबई महानगर क्षेत्राला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसीत केले जाणार आहे. एक ट्रिलीयन अर्थव्यवस्था करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. रोजगार, परवडणारी घरे यांच्यासह उद्योग, वाणिज्य केंद्र अशा विविध प्रकल्पांची उभारणी या अंतर्गत केली जाणार आहे. त्याच धर्तीवर मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे जिल्हा आणि पर्यायायने नवी मुंबई हे मोठे आर्थिक केंद्र म्हणून पुढे येणार आहे. काही दिवसांपूर्वी याच पार्श्वभूमीवर लॉजिस्टीक पार्कची घोषणा करण्यात आली. यात भिवंडीत हे पार्क उभारले जाणार आहे.

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सात आर्थिक विकास केंद्र विकसीत करण्याची घोषणा केली. यात ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई आणि खारघर या दोन शहरात हे केंद्र उभारले जाणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून यापूर्वीच विकास केंद्राची घोषणा करण्यात आल होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या ठाणे जिल्ह्यातील आणि विशेषतः नवी मुंबईतील या केंद्रांमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे या भागात आंतरराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. नवी मुंबईतच जेम्स ऍंड ज्वेलरी पार्कची उभारणी केली जाते आहे. सुमारे एक लाख रोजगारांची निर्मिती करणाऱ्या अशा प्रकल्पांमुळे नवी मुंबई नवे आर्थिक केंद्र ठरणार आहे.

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय बाजार

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स अर्थात बीकेसीच्या धर्तीवर खारघर येथे व्यावसायिक कॉर्पोरेट पार्कची उभारणी केली जाते आहे. त्यामुळे नवे उद्योग आणि व्यवसाय केंद्र खारघर येथे तयार होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या पार्कला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार आहे. त्याच अनुषंगाने राज्य सरकराने आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय बाजार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मुंबईपासून नवी मुंबई आणि परिसराचे नव्या अटल सेतू आणि किनारी मार्गामुळे कमी झालेले अंतर, परिसरात सुरू असलेल्या नव्या जोड रस्त्यांची कामे, जवाहरलाल नेहरू बंदर न्यास ते बडोदे महामार्ग, मेट्रो मार्गिका अशा वाहतुकीच्या पर्यायांमुळे या नव्या आर्थिक विकास केंद्र आणि आंतरराष्ट्रीय बाजार याच्यासह इतर प्रकल्पांच्या उभारणीला बळ मिळणार आहे.

Story img Loader