ठाणे शहरातील विविध चौकाचौकांमधून भीक मागत फिरणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ‘सिग्नल शाळा’ या अभिनव प्रकल्पाची आखणी केली आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प केवळ विकास प्रकल्प आणि जमा-खर्चाच्या आकडय़ांपुरता मर्यादित राहू नये, तर त्यास वास्तववादी सामाजिक चळवळीची जोड मिळावी यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात काही प्रयोगांची आखणी करण्यात आली आहे.
महापालिकांच्या शिक्षण मंडळांच्या माध्यमातून दरवर्षी स्वतंत्र असा अर्थसंकल्प मांडला जात असतो. जयस्वाल यांनी मात्र मूळ अर्थसंकल्पात शिक्षण विभागाशी संबंधित अशा विविध योजनांना स्थान देत काही अभिनव संकल्पनाही पुढे आणल्या आहेत. शहरातील कॅडबरी तसेच नितीन कंपनी अशा महत्त्वाच्या जंक्शनवर भिक्षा मागत फिरणाऱ्या मुलांचा आकडा मोठा आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. त्यामुळे अशा मुलांसाठी सिग्नलजवळच फिरती शाळा सुरू करण्यात येईल, अशी घोषणा जयस्वाल यांनी या वेळी केली. शिक्षणासोबत या मुलांच्या भोजनाची व्यवस्थाही महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. ज्येष्ठ समाजसेविका अनुताई वाघ यांच्या प्रेरणेतून ‘जेथे मूल तेथे शाळा’ या संकल्पनेवर आधारित ही शाळा असणार आहे. या प्रकल्पासाठी दोन मोठय़ा स्वरूपांची वाहने खरेदी करण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. या वाहनांमध्ये शिक्षणाच्या सोयीसोबतच मुलांच्या भोजनाचीही व्यवस्था करण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थितीमुळे आठवीनंतर शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी एकलव्य रात्रशाळा सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रकल्प
महापालिका शाळांचा दर्जा अधिक उंचवावा या उद्देशातून आयुक्तांनी विविध प्रकल्प आखले आहेत. त्यामध्ये शाळांना संरक्षक भिंती बांधणे, प्रत्येक शाळेत मुलींसाठी दोन नवीन शौचालये उभारणे, शाळांची दुरुस्ती व सर्व शाळांना एकच रंग, सौरऊर्जा प्रकल्प, अनुताई वाघ बालउत्कर्ष योजना, गोपाळ गणेश आगरकर सेमी इंग्लिश स्मार्ट स्कूल, डॉ. अब्दुल कलाम व्हच्र्युअल क्लासरूम, राजमाता जिजाऊ कृतियुक्त अध्ययन पद्धती योजना आदी प्रकल्पांचा समावेश आहे.

Story img Loader