उल्हासनगर: उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात एक साठ वर्षे व्यक्ती गंभीर झाले आहेत. आत्तम प्रकाश अपार्टमेंट असे या इमारतीचे नाव असून ही इमारत कॅम्प पाच भागात आहे. या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब थेट दुसऱ्या मजल्यावर आला. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. यापूर्वी स्लॅब कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या असून त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
गेल्या काही वर्षात उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात अनेक ठिकाणी जुन्या आणि मुलगा झालेल्या इमारती अपघात ग्रस्त होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठवड्यात एका जुन्या इमारतीच्या खिडकीचा काही भाग शेजारी असलेल्या बैठ्या घरावर जाऊन पडला होता. त्यामुळे या घरात असलेल्या साहित्याचे मोठे नुकसान झाले होते तर घराबाहेर काम करत असलेली एक महिला यात जखमी झाली होती.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास कॅम्प पाच भागातील अत्ताम प्रकाश अपार्टमेंट या इमारतीचा तिसरा मजल्याचा स्लॅब कोसळला. हा स्लॅब कोसळून थेट दुसऱ्या मजल्यावर आला. या घटनेत एक ६० वर्षीय व्यक्ती घरात अडकल्या होत्या. राजकुमार दुसेजा असे या व्यक्तीचे नाव असून उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. तसेच त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेनंतर इमारतीत भीतीचे वातावरण आहे. उल्हासनगर महापालिकेने ही इमारत पाहणी केल्यानंतर रिकामी अथवा पुढील कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.
उल्हासनगर शहरात १९९० च्या दशकात उभारण्यात आलेल्या अनेक इमारती निकृष्ट दर्जाच्या साहित्याच्या वापरातून उभ्या राहिल्या आहेत असे अनेकदा चर्चिले जाते. त्यानंतर याच दशकाच्या अखेरीस शहरात पालिका प्रशासनाच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाई इमारतींचे स्लॅब तोडण्यात आले. मात्र काही काळ गेल्यानंतर इमारतीतील रहिवाशांनी हेच स्लॅब पुन्हा जोडले. यावेळी अभियांत्रिकी नियम तोडले गेले. परिणामी कमकुवत असे स्लॅब वापरात आले. असेच स्लॅब कोसळल्याच्या घटना गेल्या काही वर्षात घडल्या आहेत.
पुनर्विकास रखडलेलाच
उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी विविध निर्णय घेतले गेले. विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मात्र शहरातील पुनर्विकासाची प्रकरणे अद्याप मार्गी लागताना दिसत नाहीत. त्यामुळे रहिवाशी अशा डोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करताना दिसत आहेत.