लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी येथील सोनाळे भागात आज टँकरचा कारला धक्का लागल्याने कार चालकाने तो टँकर भर रस्त्यात अडवून टँकरची किल्ली काढली. त्यानंतर तो कार चालक किल्ली घेऊन निघून गेला. या प्रकारामुळे टँकर रस्त्याच्या मध्येच उभा होता. त्यामुळे महामार्गावर तीन तास कोंडी झाली. याप्रकरणाची ठाणे ग्रामीण पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून टँकर चालकाच्या तक्रारीनंतर भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरील सोनाळे येथील वृदांवन कॉम्प्लेक्स परिसरातून मंगळवारी सकाळी एक कार चालक नाशिकच्या दिशेने भरधार वाहन चालवित होता. त्यावेळी दुधाची वाहतुक करणाऱ्या एका टँकरचा त्या कारला धक्का लागला. यामुळे संतापलेल्या कार चालकाने टँकरपुढे त्याची कार थांबविली. त्यानंतर तो कारमधून खाली उतरला. त्याने टँकर चालकासोबत हुज्जत घालत टँकरची किल्ली काढून घेतली. तसेच तो कार घेऊन निघून गेला.

आणखी वाचा-ठाणे स्थानकातील पादचारी पुलांवर गर्दीचा महापूर

या प्रकारामुळे टँकर भर रस्त्यात उभा होता. त्यामुळे त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर झाला. वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. येथील कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकी नऊ आले. तीन तास महामार्गावर कोंडी झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे ग्रामीण पोलिसांनी संबंधित कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. टँकर चालकाने याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर संबंधित कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या वाहन क्रमांकाच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bullying of the driver and three hours of traffic on the highway mrj