डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील अरुणोदय सोसायटी भागात एका सेवानिवृत्त रहिवाशाच्या बंद घराच्या खिडकीच्या लोखंडी जाळ्या तोडून घरात प्रवेश करुन चोरट्यांनी घरातील आठ लाख ५६ हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज, ४० हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली. विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी रहिवाशाने तक्रार केली आहे.
हेही वाचा >>> ठाणे : लाचेप्रकरणी पोलीस कर्मचारी ताब्यात
विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिक, पादचारी हैराण आहेत. प्रकाश शिंपी (६५, रा. सिध्दी सोसायटी, माऊली रुग्णालय, महात्मा फुले रस्ता, डोंबिवली पूर्व) असे तक्रारदार रहिवाशाचे नाव आहे. ते काही कामा निमित्त बाहेरगावी गेले होते. बुधवारी घरी परत आल्यानंतर त्यांना घराच्या पाठीमागील बाजूकडील खिडकीची लोखंडी जाळी आणि त्याला लावण्यात आलेली काच फोडली असल्याचे दिसले. घरातील सामान चोरट्यांनी फेकून दिले होते. ऐवज असलेल्या कपाटातील तिजोरी पाहिली असता त्यात काही आढळून आले नाही. चोरट्यांनी तिजोरीतील आठ लाख ५६ हजार रुपयांचे दागिने आणि ४० हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली होती. उपनिरीक्षक एम. बी. कपिले या प्रकरणाचा तपास करत आहेत.