कल्याण – नवीन वर्षाचे स्वागत करताना पर्यावरणाला हानी होईल, अशी कोणतीही कृती नागरिकांनी करू नये. रविवारी मध्यरात्री नवीन वर्षाचे स्वागत करताना फक्त ११.५५ ते १२.३० या कालावधीत फटाके फोडावेत. या व्यतिरिक्तच्या कालावधीत कोणी फटाके फोडण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी दिला आहे.
नागरिकांनी ध्वनी, हवा प्रदूषण होईल, अशा पद्धतीचे फटाके फोडण्याऐवजी पर्यावरणस्नेही, ध्वनीमुक्त फटाके फोडण्यावर भर द्यावा, असे आवाहन पालिकेतर्फे पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी केले आहे. शहरातील हवा स्वच्छ राहील यादृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. सर्वोच्च न्यायालयाने रविवारी मध्यरात्री ११.५५ ते १२.३० या कालावधीत फटाके फोडण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशाचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे कल्याण डोंंबिवली पालिका प्रशासनाने नागरिकांना विहित वेळेत नववर्ष स्वागताचे फटाके फोडण्यासाठी आवाहन केले आहे.
हेही वाचा – ठाण्यात रेव्ह पार्टी, १०० जण ताब्यात
हेही वाचा – ठाण्यात १९ आणि २३ वर्षांच्या तरूणांकडून रेव्ह पार्टीचे आयोजन; पाच महिलांसह ९५ जण ताब्यात
पोलीस बंदोबस्त
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर परिसरात नववर्ष स्वागत कार्यक्रमात कोठेही विघ्न नको, सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी बाराशे पोलीस शहराच्या विविध भागांत तैनात केले आहेत. हाॅटेल, बार चालकांनी आवश्यक काळजी घेऊन ग्राहक सेवा द्यावी. हाॅटेलमध्ये कोणतेही वादाचे प्रसंग होणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन हाॅटेल चालकांना करण्यात आले आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर शहरांच्या मुख्य प्रवेशव्दारावर रस्त्यांवर वाहन चालकांची तपासणी करण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांंवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.