महापालिका क्षेत्रातील अंतर्गत तसेच क्षेत्राबाहेरील मार्गांवर प्रवाशांच्या मागणीनुसार ठाणे परिवहन उपक्रमाची (टिएमटी) बससेवा सुरु करण्यात येत असतानाच, त्यापाठोपाठ अशाचप्रकारे प्रवाशांच्या मागणीनुसार परिवहन प्रशासनाने पारसिकनगर ते वाशी रेल्वे स्थानक अशी बससेवा सुरू केली आहे. या सेवेचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सुविधेचा फायदा होणार आहे.
हेही वाचा >>> ठाणे : काटई-बदलापूर रोडवर अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत रहिवाशाचा मृत्यू
ठाणे महापालिकेच्या क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झाले आहे. या भागातील नागरिकांसाठी टीएमटीच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीची सुविधा पुरविण्यात येते. प्रवाशांच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी असून या बसगाड्यांची संख्या वाढविण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही वर्षात विविध निधीच्या माध्यमातून या बसगाड्यांची खरेदी करण्यात आली असून यामुळे बसगाड्यांच्या संख्येत काहीप्रमाणात वाढ झाली आहे. या बसगाड्यांचे नियोजन विविध मार्गांवर प्रवाशांच्या मागणीनुसार करण्यात येत आहे. अशाचप्रकारे पारसिक नगर ते वाशी रेल्वे स्थानक या मार्गावर टीएमटीची बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. पारसिक नगर, खारीगाव, कळवा येथून वाशी येथे रोजगारासाठी जाणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठी आहे. वाशी येथे विविध आस्थापनांची कार्यालये असल्याने नोकरदारवर्गाला आपले नोकरीचे ठिकाण गाठण्यासाठी कळव्याहून ठाणे स्थानक गाठून वाशीला जावे लागत होते. हा द्रविडी प्राणायाम टाळण्यासाठी ही बससेवा सुरु करण्याची मागणी होत होती. त्यासाठी ठाणे परिवहन समिती सदस्य प्रकाश पाटील यांच्यासह अभिजीत पवार हे प्रशासनाकडे पाठपुरावा करित होते.
हेही वाचा >>> आंबिवली रेल्वे स्थानकात थेट फलाटावर रिक्षा आणणाऱ्या चालकाला अटक
अखेर प्रशासनाने ही मागणी मान्य करत या मार्गावर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ठाणे शहरातून वाशी रेल्वे स्थानकात जाणारी टीएमटीची पहिलीच बससेवा गुरूवारपासून सुरू करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या बससेवेला हिरवा झेंडा दाखविला. पारसिक नगर येथून बरेच तरूण-तरुणी दररोज वाशी येथे प्रवास करीत असतात, त्या सर्वांना या बससेवेचा फायदा होईल, अशी आशा आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी परिवहन सभापती विलास जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, माजी विरोधीपक्ष नेते मिलींद पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.